येळ्ळूर ( ता. जि. बेळगाव) येथे मागील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक – अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचा आदेश बेळगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी द्वितीय न्यायालयाने दिला आहे.
निवडणूक आचार संहिता भंग केल्याप्रकरणी 2018 साली बेळगाव ग्रामीण पोलीसांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या खटल्याच्या सुनावणीप्रसंगी भिडे गुरुजी गैरहजर होते. याची गांभीर्याने दखल घेऊन न्यायाधीशांनी त्यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचा आदेश दिला आहे. भिडे गुरुजींसह येळ्ळूर येथील कुस्ती मैदानाचे आयोजक मिळवून एकूण 10 जणांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणी प्रसंगी त्यापैकी फक्त 6 जण उपस्थित होते. उर्वरित चौघांपैकी मारुती कुगजी यांचे निधन झाले असून भिडे यांच्यासह अन्य दोघे गैरहजर होते. यापैकी संभाजी भिडे यांच्यावर अटक वॉरंट बजावण्याचा आदेश दिला गेला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 24 तारखेला आहे. बचाव पक्षाकडून अॅड. शामसुंदर पत्तार व ॲड. हेमराज बेंचण्णावर काम पहात आहेत.
याबाबतची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, येळ्ळूर येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानावर कर्नाटक विधानसभा निवडणुक आचारसंहिताच्या काळात गेल्या 13 एप्रिल 2018 रोजी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटक या नात्याने बोलताना संभाजी भिडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करावे तसेच समितीच्या विरोधातील उमेदवारांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन करून येळ्ळूर कुस्ती मैदानाबद्दल गौरवोद्गार काढले होते. तेंव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भिडे यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.