काळाची गरज लक्षात घेऊन बेळगाव शहरासह सीमाभागातील भावी पिढीमध्ये सीमालढा, त्याची पार्श्वभूमी – इतिहास तसेच मराठी भाषा संस्कृती याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे एक उत्तम संकल्पना राबविण्यात येत आहे.
या संकल्पने अंतर्गत येत्या शुक्रवार दि. 21 फेब्रुवारी 2020 रोजी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी येत्या 20 फेब्रुवारीपर्यंत आणि आदर्श शाळा पुरस्कारासाठी 22 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी शनिवारी आयोजीत पत्रकार परिषदेत संबंधित माहिती घेऊन सदर आवाहन केले. सामान्य ज्ञान स्पर्धा येत्या शुक्रवारी 21 रोजी मराठा मंदिरच्या सभागृहांमध्ये होणार आहे. शुभम शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती व परंपरेचे संवर्धन तसेच शिवकालीन इतिहास आत्मसात करण्याबरोबरच मराठी मुले बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धांना आत्मविश्वासाने सामोरे जावीत, या उद्देशाने सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सामान्य ज्ञान स्पर्धा इयत्ता पहिली ते 7 वी प्राथमिक गट आणि इयत्ता 8 वी ते 10 वी माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे. सदर स्पर्धा मराठी भाषेत होणार असून या स्पर्धेत अन्य भाषेचे डस्पर्धकही भाग घेऊ शकतात. स्पर्धेच्या अभ्यासक्रमात शिवकालीन इतिहास, बेळगावचा लढा, त्याची पार्श्वभूमी, सामान्य ज्ञान आणि मराठी विज्ञान गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता चाचणी यांचा समावेश असणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न असे असणार असून उत्तर पत्रिकेचे स्वरूप अ, ब, क, ड असे पर्याय असणार आहेत. बहुपर्यायी प्रश्न 95 असणार असून त्यासाठी प्रत्येकी एक गुण दिला जाणार आहे. प्रश्नपत्रिकेत एक लेखी प्रश्न विचारला जाणार असून त्यासाठी 5 गुण देण्यात येतील. या स्पर्धेत नाव नोंदवण्याची अंतीम तारीख 15 फेब्रुवारी ही होती. परंतू बेळगाव लढा, त्याची पार्श्वभूमी व इतिहास यासंदर्भात म. ए. युवा समितीने तयार केलेला अभ्यासक्रम लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचला नसल्यामुळे नाव नोंदणीची मुदत दोन दिवसांनी वाढवून देण्यात आली असून आता इच्छुकांना मंगळवार दि. 17 फेब्रुवारीपर्यंत आपली नांवे नोंदविता येणार आहेत.
सीमाभागातील मराठी शाळांचा दर्जा उंचावावा यासाठी “आदर्श शाळा पुरस्कार” उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सीमाभागातील मराठी शाळांचा खालावत चाललेला दर्जा आणि घसरत असलेली पटसंख्या यात सुधारणा व्हावी यासाठी बेळगाव उत्तर-दक्षिण व ग्रामीण मतदारसंघासह यमकनमर्डी आणि खानापूर मतदारसंघातील एका शाळेची निवड केली जाणार आहे. यासाठी संबंधित शाळेने पटसंख्या वाढीसाठी केलेले प्रयत्न शाळेत राबवलेले विविध उपक्रम शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि शाळा परिसर पर्यावरणपूरक करण्यासाठी केलेले प्रयत्न हे निकष लक्षात घेतले जाणार आहेत. आदर्श शाळा पुरस्कारासाठी सीमाभागातील मराठी शाळांनी दि. 22 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.
उपरोक्त उपक्रमांव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील मराठी शाळांना जे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात म. ए. युवा समितीकडे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तेंव्हा शाळा सुधारणा समितीने अर्ज करताना संबंधित शाळेच्या माहितीसह वर्गखोल्या, आवश्यक असलेली दुरुस्ती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक, प्रोजेक्टर, शैक्षणिक साहित्य, संरक्षक भिंत व इतर आवश्यक गोष्टींची आवश्यकता असल्यास त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. शाळेच्या दुरुस्तीसाठी शाळा सुधारणा समितीने केलेला ठराव असेल तर तो अर्जासोबत जोडावयाचा आहे. तसेच संस्थेचा ऑडिट रिपोर्ट व बँक खाते क्रमांक ही द्यावयाचा आहे. हे सर्व कांही 20 फेब्रुवारीपर्यंत अर्जासह वेळेवर दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आलेल्या अर्जाची माहिती महाराष्ट्र सरकारला देण्यात येणार असून जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा पुरावा केला जाणार आहे.