केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत आता आणखीन एक उपक्रम राबविला जाणार असून त्याला ‘सिस्टर सिटी’ असे नांव देण्यात आले आहे. सिस्टर सिटी उपक्रमांतर्गत देशातील टॉप-20 स्मार्ट सिटीजना अर्थात शहरांना आता सर्वाधिक मागास अशा 20 शहरांशी जोडले जाणार असून त्यांच्यावर संबंधित मागास शहरांच्या विकासाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. दरम्यान स्मार्ट सिटीच्या नावाखाली बेळगावात चाललेला विकास कामाचा खेळखंडोबा पाहता भविष्यात बेळगाववर चुकून देखील ‘सिस्टर सिटी’ची जबाबदारी सोपवली जाऊ नये, अशी प्रतिक्रिया विकास कामांना कंटाळलेल्या बेळगावकरांमध्ये व्यक्त होत आहे.
सध्या महाराष्ट्रातील पुणे व नाशिकसह देशातील वाराणसी, आग्रा, अहमदाबाद, भोपाळ, अमरावती, डेहराडून, रांची, विशाखापट्टनम, उदयपूर, इंदोर, कोटा, वेल्लोर, सुरत, बडोदा, कानपूर, नागपुर, तिरुपुर व दावणगेरे या देशातील टॉप 20 स्मार्ट सिटींना त्यांच्या सिस्टर सिटीज नेमून दिल्या गेल्या आहेत. भविष्यात केंद्र सरकारचा ‘सिस्टर सिटी’ हा उपक्रम बेळगावाच्या बाबतीतही वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि सध्याचे स्मार्ट सिटी बेळगावचे स्वरूप पाहता सिस्टर सिटीची जबाबदारी न सोपवलेलीच बरी असे असे म्हणण्याची वेळ आली आहे.
स्मार्ट सिटी लिमिटेड बेळगावतर्फे अनेक विकास कामे एकाच वेळी राबविली जात आहेत. परिणामी गेल्या काही महिन्यांपासून शहरातील काही रस्ते उत्तम झाले आहेत तर काही रस्त्यांची वाताहत झालेली पहावयास मिळत आहे. ठिकठिकाणी खोदाई करून गॅस पाईपलाईन, इलेक्ट्रिक केबल्स, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवली जात आहेत. एकाच वेळी अनेक रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे रहदारीची समस्या ऐरणीवर आली आहे. हाती घेण्यात आलेली सर्व विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात येत असले तरी ठराविक विकास कामे वगळता अन्य बहुतांश विकास कामे संथ गतीने सुरूच आहेत. रस्त्यांच्या नूतनीकरणाचे काम, केबल्स आणि गॅस वाहिन्यांसाठी करण्यात येत असलेली खुदाई आदींमुळे यामुळे शहराच्या बहुतांश भागाची अक्षरश: वाताहत झाली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावच्या स्मार्ट सिटी लिमिटेडला फक्त बेळगाव शहराचा नियोजनबद्धरीत्या निर्धारित वेळेत विकास करणे जमत नसेल तर भविष्यात त्यांना सिस्टर सिटीची जबाबदारी कशी काय पेलवणार? असा सवाल केला जात आहे.