बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (बीडीसीसीबी) वर्चस्व स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांना व्यवस्थित हाताळण्यात आले नाहीतर या बँकेची झपाट्याने जवळ येत चाललेली निवडणूक राज्यात पुन्हा राजकीय वादळ आणू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. कारण यापूर्वी 2018 मध्ये अशाच एका बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांना हाताळण्यात पक्षश्रेष्ठींना अपयश आल्यामुळेच मागील वर्षी राज्यातील निजद – काँग्रेस युतीचे सरकार लयास गेले होते.
सध्या बीडीसीसीबी बँकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी रमेश कत्ती त्यांचे बंधू आमदार उमेश कत्ती आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या पारंपरिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या तीनही भाजप नेत्यांमध्ये चुरस लागली आहे. माजी खासदार रमेश कत्ती यांनी तीन वेळा या प्रतिष्ठित बँकेचे अध्यक्षपद भुषविले आहे. कत्ती यांनी 2015 मध्ये प्रतिस्पर्धी लक्ष्मण सवदी यांच्यावर निसटता विजय मिळवून बँकेचे अध्यक्षपद हस्तगत केले. सवदी व कत्ती हे दोघेही ही भाजपचे असले तरी त्यावेळी कत्ती बंधूंनी राजकीयदृष्ट्या बलवान असलेल्या जारकीहोळी बंधूंची मते आपल्याकडे फिरवण्यात यश मिळविले होते. परिणामी लक्ष्मण सवदी हे कत्ती बंधूंवर नाराज होऊन संतप्त बनले. त्यांच्यातील हे शत्रुत्व तेंव्हा हा जाहीर प्रकट झाले जेंव्हा आठ वेळा आमदार झालेल्या उमेश कत्ती यांनी विद्यमान मंत्रिमंडळात योग्य स्थान न मिळाल्यास पक्ष सोडण्याची धमकी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दिली. याउलट विधानसभा निवडणूक करणाऱ्या लक्ष्मण सवदी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले.
आता यावेळी रमेश कत्ती हे आपले डीसीसी बँकेचे अध्यक्षपद टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान 2015 मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी लक्ष्मण सवदी देखील यावेळी डीसीसी बँकेची निवडणूक लढविण्याची किंवा आपला उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. एकंदर परिस्थितीला आणखी एक कलाटणी देताना पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी गेल्या शनिवारी बेळगावमध्ये बोलताना डीसीसी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात माझे बंधू भालचंद्र जारकीहोळी आणि रमेश कत्ती अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट केले आहे. डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात या ज्या काही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी पीएलडी बँकेच्या निवडणुकीप्रसंगी जारकीहोळी बंधू आणि लक्ष्मी हेब्बाळकर या तीनही भाजप नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची करून एकमेकांविरुद्ध शत्रुत्वपूर्ण लढत दिल्यामुळे राज्यातील मागील निजद व काँग्रेस युतीचे सरकार कोसळले होते.