कर्नाटक प्रीमियर लीग (केपीएल) घोटाळ्याप्रकरणी सीसीबी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलेल्या बेळगाव पॅंथर्स संघाच्या मालकासह सोळा जणांविरुद्ध पुरावे उपलब्ध असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे.
कर्नाटक प्रीमियर लीग फिक्सिंग अर्थात घोटाळ्याप्रकरणी बेळगाव पॅंथर्स संघाचा मालक अली अश्फाक थारा, डावखुरा फिरकी गोलंदाज अब्रार काझी सीएम गौतम, माजी क्रिकेटपटू आणि कर्नाटक क्रिकेट संघटना व्यवस्थापक सुधींद्र शिंदे, गोलंदाज प्रशिक्षक विष्णुप्रसाद, निशांत सिंग शेखावत, बळारी टस्करचा मालक अरविंद रेड्डी, एम. विश्वनाथ, भावेश बाफना, मावी, बुकी सान्याम गुलाटी आदींसह एकूण 16 जणांवर सीसीबी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
गेल्या 2019 सालची कर्नाटक प्रीमियर लीग संपल्यानंतर सीसीबी पोलिसांनी वेगाने तपासकार्य हाती घेऊन पुरावे सापडल्यानंतर संबंधितांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सामन्यावर बेटिंग लावल्याप्रकरणी सर्वप्रथम बेळगाव पॅंथर्सचा मालक अली अश्फाक थारा याला अटक करण्यात आली होती. पोलिसांनी सर्व संशयितांची चौकशी केली असून सर्वांची सध्या जामिनावर मुक्तता झालेली आहे. दरम्यान, आरोपपत्र दाखल केलेल्यांविरुद्ध सर्व पुरावे उपलब्ध असल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सीसीबी पोलिस सहआयुक्त संदीप पाटील यांनी दिली आहे.