कर्तव्य, मान, साहस जपणाऱ्या बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मराठा लाईट इन्फंट्रीच्या चौफेर अष्टपैलू कामगिरीची दखल घेऊन “जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांड युनिट अॅप्रिसिएशन” या प्रतिष्ठेच्या किताबाने मराठा लाईट इन्फंट्रीला गौरवले गेले आहे.
मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे गेल्या 20 फेब्रुवारी 2020 रोजी झालेल्या दिमाखदार समारंभात मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला (एमएलआयआरसी) सदर पुरस्कार देण्यात आला. मराठा लाईट इन्फट्रीचे ब्रिगेडियर गोविंद कलवाड आणि सुभेदार मेजर (ऑनररी लेफ्टनंट) काशीराम हारेकर यांनी हा सन्मान स्वीकारला. यापूर्वीही मराठा लाईट इन्फंट्रीला 1918 मध्ये “बॅटल ऑनर शरकत” या किताबाने गौरवले गेले होते. तसेच 2011 आणि 2020 मध्ये सदर्न कमांड युनिट ॲप्रिसिएशनने गौरवले गेले होते. आता “जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ सदर्न कमांड युनिट अॅप्रिसिएशन” या किताबाने बेळगावच्या मराठी लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. हा किताब म्हणजे मराठा लाईट इन्फंट्रीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
![Mlirc award](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/02/IMG-20200220-WA0358.jpg)
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सैनिकांना केवळ प्रशिक्षण दिले जात नाही तर तेथे योध्ये घडवले जातात, जे देशाच्या सीमेचे आणि देशबांधवांचे रक्षण करतात. बेळगाव जिल्ह्यावर आलेल्या पुराच्या संकटप्रसंगी मराठा लाईट इन्फंट्रीच्या अधिकारी व जवानांनी अतुलनीय अशी कामगिरी केली.
इन्फंट्रीच्या जवानांनी 7 हजारहून अधिक लोकांना पूर परिस्थितीतून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. आपला जीव धोक्यात घालू हे काम करताना मराठा सेंटरचे जवान एका अर्थाने कर्तव्य, मान आणि साहस या इन्फंट्रीच्या ब्रीदाला जागले, असे म्हणावयास हवे.