सालाबादप्रमाणे बेळगाव भुईकोट किल्ला येथे शिवाजी ट्रिल संस्थेमार्फत गड पूजनाचा कार्यक्रम आज रविवारी सकाळी धार्मिक वातावरणामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
राष्ट्रीय स्तरावरील शिवाजी ट्रिल संस्थेतर्फे दरवर्षी गड पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. हा कार्यक्रम सर्व शिवकालीन सरदार वंशजांच्या हस्ते केला जातो. त्याअनुषंगाने आज रविवारी सकाळी बेळगाव भुईकोट किल्ला येथे श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार – सरलष्कर यांनी सपत्नीक पारंपारिक पद्धतीने भुईकोट किल्ल्याचे विधिवत पूजन करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे सरकारांनी सपत्नीक किल्ल्यातील श्री दुर्गादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्रीमंत सौ. साम्राज्य लक्ष्मीराजे निपाणीकर, श्रीमंत रमेश केशवराव रायजादे समशेरबहाद्दर बहादूर हरोलीकर, श्रीमंत सौ. संचीता रमेशराव रायजादे, नितीन कपिलेश्वरी, सतीशराव कृष्णकांत चिरमोरे किल्लेदार गडकरी-पारगड, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
शिवकालीन रीतीरिवाजाप्रमाणे तत्कालीन पेहरावात आलेले श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार – सरलष्कर आणि त्यांच्यासोबत असलेला लवाजमा सार्यांचे लक्ष वेधून घेत होता. किल्ले पूजनाच्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार म्हणाले की, शिवाजी ड्रिल संस्थेमार्फत दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी गड पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, तसेच या पद्धतीने अखिल हिंदुस्थानातील सुमारे 350 गड-किल्ल्यांमध्ये हा गड पूजनाचा कार्यक्रम केला जातो. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची माहिती व्हावी हा या गड पुजना मागील मुख्य उद्देश आहे. हे गड-किल्ले म्हणजे आपल्या शिवकालीन पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाचे स्तंभ आहेत. तेंव्हा राज्य व केंद्र सरकारने या गड-किल्ल्यांच्या जपणुकीसाठी व संवर्धनासाठी आवश्यक ते सर्व कांही करावे अशी आमची अपेक्षा आहे विशेष करून केंद्र सरकारने यात जातीने लक्ष घालून गड-किल्ल्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे, अन्यथा भावी पिढीला या गड किल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व कळणार नाही, असेही श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार यांनी स्पष्ट केले.
नवतरुण व नवयुवकांना गड-किल्ल्यांची सातत्याने आठवण यावी आणि त्यांनी गड किल्ल्यांना भेटी देऊन तेथील इतिहास जाणून घ्यावा. याखेरीज छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्ले जिंकून किंवा शाबूत ठेवून जे स्वराज्य वाढवले त्याची आठवण म्हणून आम्ही प्रतिवर्षी गड- किल्ल्यांचे पूजन करतो, जेणेकरून त्यांचे पवित्र अबाधित राखले जाते, असे नितीन कमलेश्वरी यांनी यावेळी सांगितले. भुईकोट किल्ला येथील गड पूजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेथील टी ए बटालियनचे सहकार्य लाभले.