इलेक्ट्रिक मर्चंट्स असोसिएशन बेळगाव या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण बैठक शुक्रवारी खेळीमेळीत पार पडली.
शहरातील युके ट्वेंटी सेव्हन हॉटेलच्या सभागृहांमध्ये द इलेक्ट्रिक मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अॅड. अनिल बेनके उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष भंवरलाल चौहान, सचिव डायमंड दोशी आदी उपस्थित होते. सर्वसाधारण सभेचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले झाले. यावेळी संघटनेतर्फे आमदारांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आपल्या उद्घाटनपर भाषणात आमदार बेनके यांनी मोबाईलपासून सर्वच वस्तूंसाठी आज-काल इलेक्ट्रिसिटी अत्यावश्यक आहे. त्यामुळे भावी काळात इलेक्ट्रिक दुकानदारांना जास्त महत्त्व प्राप्त होणार असल्याचे सांगितले. जगात इलेक्ट्रिकल मर्चंट्सना जेवढे महत्त्व आहे तेवढे इतर कोणालाही नाही असे मला वाटते. संघटनेचा उत्कर्ष होण्यासाठी तन-मन-धन या तीन गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. प्रत्येकाने तन-मन-धन अर्पूण कार्य केले तरच संघटना मोठी होते. संघटना मोठी झाल्यानंतर फुटीर लोक किंवा विघ्नसंतोषी लोकांना भीक न घालता संघटना अबाधित ठेवली पाहिजे, तसेच संघटनेत मागे पडलेल्यांना पुढे आणले तरच संघटनेची वृद्धी होते. इतरांना मोठे केलंत तरच तुम्ही मोठे होता. सध्या बेळगाव स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. विद्युतीकरणासाठी तब्बल 40 हजार एलईडी बल्बची खरेदी करण्यात आली आहे. थोडक्यात स्मार्ट सिटीच्या कामामुळे बेळगावातील इलेक्ट्रिक व्यवसायिकांना चांगला फायदा होणार आहे असे सांगून गेल्या पूर परिस्थिती मध्ये इलेक्ट्रिक मर्चंट असोसिएशन बेळगावने केलेल्या समाजोपयोगी कार्यातबद्दल आमदार अॅड. अनिल बेनके यांनी प्रशंसोद्गार काढले.
सर्वसाधारण सभेत मागील वर्षाच्या जमा खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे वार्षिक सदस्य असलेल्या असणाऱ्या सर्वांना आजीवन सदस्यत्व बहाल करून त्यांचे संघटनेत स्वागत करण्यात आले. गेल्या वर्षभरात राबवण्यात आलेल्या जीएसटी संदर्भातील परिसंवाद, कामगार कायद्यासंदर्भातील परिसंवाद, पूर परिस्थिती दरम्यान संघटनेतर्फे सुमारे 1.50 ते 2 लाख रुपये खर्चून विविध साहित्यांच्या स्वरूपात पूरग्रस्तांना केलेली मदत आदी उपक्रमांबाबत सर्वसाधारण बैठकीत माहिती देण्यात आली.
याप्रसंगी माजी आमदार मनोहर कडोलकर, संघटनेचे संयुक्त सचिव ओमप्रकाश राठोड, खजिनदार बाबूलाल पोरवाल, संयुक्त खजिनदार किरण मिरजी, अभिजित शहा, नरेश जैन, संजय भंडारी, लक्ष्मणसिंग राठोड, नवरत्नसिंग पन्वार आदींसह इलेक्ट्रिक मर्चंट्स असोसिएशन बेळगावचे सर्व सदस्य उपस्थित होते. वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे सूत्रसंचालन सचिव डायमंड दोशी यांनी केले.