मोठ्या उद्योगांकडून उत्पादनांची कमी दरात विक्री करून भेदभाव निर्माण केला जात आहे. तेंव्हा एक देश… एक कर आणि एक दर ही संकल्पना राबविली जावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा वितरक संघटनेसह समस्त व्यापारी संघटनांनी केली आहे.
बेळगाव जिल्हा वितरक संघटनेसह समस्त व्यापारी संघटनांनी सदर मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सादर करण्यात आलेले हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शहरात मोठ्या उद्योगांकडून विविध उत्पादनांची कमी दरात विक्री करून भेदभाव निर्माण केला जात आहे. याचा परंपरागत वितरक असलेल्या छोट्या दुकानदार आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे.
मोठ्या उद्योगांना आपला माल अत्यंत कमी दरात आणि बऱ्याचदा निर्धारित किंमतीपेक्षाही कमी दराने विकण्याची परवाणगी देण्यात आल्यामुळे लहान दुकानदार आणि वितरकांच्या व्यवसायाला मार बसत आहे. डी मार्ट, बिग बझार, रिलायन्स सारख्या मोठ्या आधुनिक व्यापार पद्धतीमुळे अनेकांना दुकाने बंद करावी लागली आहेत. तेंव्हा अशा मोठ्या उद्योगांना संबंधित परवाना देणे बंद करावे, विक्रीसाठी ठेवलेल्या मालाचे दर व्यापारी आणि मोठे उद्योग यांच्यासाठी समान असावेत, अशा मोठ्या उद्योगांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक मंडळ स्थापन केले जावे, एक देश… एकच कर आणि एकच दर अशी संकल्पना सरकारकडून राबविली जावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
शुक्रवारी निवेदन सादर करतेवेळी बेळगाव जिल्हा वितरक संघटनेसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
________________