बेळगाव ते धारवाड या कित्तूर मार्गे उभारण्यात येणाऱ्या नियोजित रेल्वे मार्गाने रेल्वेच्या ‘पिंक बुक’मध्ये स्थान मिळवले आहे. येत्या 2020 – 21 सालच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी फक्त 1000 रुपयांची तरतूद करण्यात आली असली तरी याचा अर्थ आता सदर रेल्वेमार्ग निश्चितपणे होणार असा आहे.
भारतीय रेल्वेच्या पिंक बुकमध्ये विविध विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत किंवा हाती घेण्यात येणार आहेत अशा विकास कामांचा अंतर्भाव असतो. या पिंक बुकमध्ये भारतीय रेल्वेच्या विविध विभागवार प्रांतांची तपशीलवार माहिती देखील असते. एकदा का अर्थसंकल्प मंजूर झाला की संबंधित प्रकल्पाची प्राथमिक टप्प्यातील कामे करण्याचे अधिकार पिंक बुकला प्राप्त होतात.
बेळगाव ते धारवाड नियोजित रेल्वेमार्गाच्या अंदाजे खर्चाला मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाशी संबंधित सर्व खात्यांच्या खर्चाला परवानगी दिली जाईल. सदर नियोजित रेल्वे मार्ग पिंक बुकमध्ये अंतर्भाव झाला याचा अर्थ हा मार्ग निश्चितपणे होणार आहे. तथापी आत्ता नव्हे, तर 2020 – 21 सालामध्येही या प्रकल्पाचे काम सुरु होणार नाही हे मात्र खरे.
आता मुख्य अडथळा रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा असून जमीन संपादनानंतरच या प्रकल्पासाठीचा निधी मंजूर होणार आहे. नियोजित बेळगाव – धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी अंदाजे 99 लाख 82 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. परंतु हा प्रकल्प पिंक बुकमध्ये समावेश व्हावा यासाठीच 2020 – 21 सालच्या अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पासाठी टोकन म्हणून 1000 रु.च्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.