राष्ट्रवादी काँग्रेस आगामी बेळगाव महानगरपालिका निवडणूक निश्चितपणे लढवेल आणि पूर्ण ताकदीनिशी लढवेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन बेळगाव जिल्हा अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.
शहरात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी बेळगाव महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार का? या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजू पाटील म्हणाले की, पक्षाच्या चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस आगामी महापालिका निवडणूक लढविणार आहे. या निवडणुकीत आम्ही पुर्ण ताकदीनिशी उतरणार असून यासंदर्भात लवकरच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहोत. यापूर्वीही राष्ट्रवादीने महापालिका निवडणूका लढविल्या असून यापुढे फक्त महापालिका निवडणूकच नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पक्षाच्या चिन्हावर लढविला जातील.
पक्षाचा नूतन जिल्हाध्यक्ष या नात्याने मी यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना संघटीत करून भक्कम मोर्चेबांधणी करणार आहे. राजकीय क्षेत्राप्रमाणे यापुढे सामाजिक क्षेत्रात देखील पूर्वीप्रमाणेच आमचा पक्ष कार्यरत राहील. जिल्हाध्यक्ष या नात्याने मी बेळगावातील विविध नागरी समस्या सोडवण्याबरोबरच विकासासंदर्भात प्रयत्नशील राहणार आहे. शहरच नव्हे तर जिल्ह्यातील नागरी समस्या आम्ही सरकारच्या पक्षपाती धोरणाच्या विरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवू. सरकारी कार्यालयात मराठी भाषेत परिपत्रके अथवा कागदपत्रे मिळावीत यासाठी यापूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्न केले आहेत. यापुढेही त्याबद्दल आवाज उठवून वेळ प्रसंगी आंदोलन छेडले जाईल असेही राजू पाटील यांनी स्पष्ट केले.
पक्षाचे ज्येष्ठ नेते के. जी. पाटील यांनी नूतन जिल्हाध्यक्ष राजू पाटील हे एक धडाडीचे कार्यकर्ते असून यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना बळकट होऊन अधिक विस्तारेल. त्याचप्रमाणे बेळगाव शहरासह जिल्हा पातळीवरील नागरी समस्या सोडवण्यासाठी कोणताही भेदभाव न करता जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण कार्यरत राहतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी राजू पाटील आणि के. जी. पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले पत्रकार परिषदेत प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.