बेळगाव बार असोसिएशनतर्फे ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019’ या विषयावर आज शनिवार दुपारी आयोजित चर्चासत्र उस्फुर्त प्रतिसादात पार पडले या चर्चासत्रात ‘नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019’ च्या बाजूने बहुतांशी मंडळींनी आपले मत व्यक्त केले.
न्यायालय आवारातील ॲडव्होकेट समुदाय भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 प्रमाणे आता 1955 सालच्या नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांद्वारे जनतेला सर्वांगाने माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित या चर्चासत्रात मोजके लोक वगळता इतर सर्वांनी सदर कायद्याच्या बाजूने आपले मत व्यक्त केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 (सीएए) त्याचप्रमाणे प्रस्थापित राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांच्या अंमलबजावणीवर सत्रात भर देण्यात आला. देशातील संसदेसह लोकसभा, राज्यसभा, खुद्द राष्ट्रपतींकडून या कायद्यांना मंजुरी मिळाली असताना हा कायदा नाकारणाऱ्यांनी आपण या देशाचे नागरिक आहोत की नाही? याचे प्रथम आत्मपरीक्षण करावे असे आवाहनही काही वक्त्यांनी केले.
सदर चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.