लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील वजीरगंज न्यायालयात गुरुवारी दुपारी अचानक झालेल्या देशी बॉम्बस्फोटाची कसून चौकशी करून आरोपींना गजाआड करण्याबरोबर कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने पंतप्रधानांकडे केली असून तशा आशयाचे निवेदन आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. ए. जी. मुळवाडमठ यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नांवे असलेले सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील वजीरगंज न्यायालयात काल गुरुवारी दुपारी अचानक देशी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये तीन वकील गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी आणखी तीन जिवंत बॉम्ब आढळून आले आहेत. बॉम्बस्फोटाचा हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना गजाआड केले जावे. तसेच त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी बेळगाव बार असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. आर. सी. पाटील, उपाध्यक्ष ॲड. सी. टी. मजली, ॲड. गजानन पाटील, ॲड. शिवपुत्र फटकळ, ॲड. कमलेश मायण्णाचे, ॲड. नितीन गंगाई, ॲड. रमेश गुडोडगी, ॲड. बसवराज बी., ॲड. सरिता श्रेयस्कर, ॲड. प्रभाकर पवार आदींसह बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.