बळ्ळारी नाल्याची त्वरित स्वच्छता करून येळ्ळूर येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी जर प्रशासनाने घेतली नाही तर समस्त येळ्ळूरवासिय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या आज सोमवारी झालेल्या मासिक बैठकीत देण्यात आला.
येळ्ळूर ग्रामपंचायतीची मासिक बैठक आज सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीत अन्य विषयांबरोबरच प्रामुख्याने बळ्ळारी नाल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
येळ्ळूर आणि वडगांवमध्ये जो बळ्ळारी नाला दरवर्षी सांडपाणी आणि केरकचऱ्यामुळे अस्वच्छ होत असतो. यंदाही हा नाला मोठ्या प्रमाणात अस्वच्छ झाला असून त्या नाल्यातून तीव्र अशी दुर्गंधी सुटली आहे. परिणामी येलूर येथील नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या 2019 च्या ग्राम सभेत बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेबद्दल लोकांनी आवाज उठविला होता आणि या बद्दलचा ठराव ग्राम सभेत सर्वानुमते संमतही झाला होता. त्यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांनी नाल्याची स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले होते. तथापी आज या गोष्टीला एक वर्ष उलटून गेले तरी बळ्ळारी नाल्याच्या स्वच्छतेबद्दल अजून कोणताही निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही.
याची आज येळ्ळूर ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या मासिक बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली. तसेच या संदर्भात सर्वांगाने चर्चा होऊन अखेर बळळारी नाल्याची स्वच्छता करून येळ्ळूर येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने जर घेतली नाही तर समस्त येळ्ळूर गावाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.