जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो बेळगाव चॅप्टर लेडीज विंगतर्फे आज सोमवारी आयोजित ‘अपना बचपन’ या अनोख्या संकल्पनेवर आधारीत खास कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात पार पडला.
रम्य ते बालपण अशी भावना प्रत्येकाच्या मनात असते, बालपण आणि शाळेच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे जितो लेडीज विंगने आपल्या सदस्यांना दिली. किल्ला येथील कमल बस्ती येथे आज सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमांतर्गत जितो लेडीज विंगच्या सदस्यांनी बालपणीच्या शाळेतील विविध खेळांच्या स्मृतींना उजाळा देत त्या खेळांचा आनंद लुटला.
प्रारंभी पूर्वी शाळेमध्ये जशी हजेरी अर्थात असेंबली होत होती तशी असेंबली घेण्यात आली. यावेळी बातम्यांचे वाचन व हवामानाचा अहवाल सादर करण्यात आला. शाळेतील सर्व प्रार्थना म्हटल्यानंतर सर्वजण वर्गात गेले, सर्वांनी पाढे म्हंटले, नवीन गाणी म्हंटली पूर्वी शाळेत ज्याप्रमाणे कविता म्हंटल्या जात त्याप्रमाणे कविता म्हंटल्या गेल्या.
जितो लेडीज विंगच्या सदस्यांनी यावेळी सांघिक व वैयक्तिक खेळाचा आनंद लुटला. यामध्ये लगोरी, रस्सीखेच, तळ्यात-मळ्यात, आईचे पत्र हरवले, सायकलिंग, दोरीच्या उड्या, सागरगोटे, कांचकवड्या, सूरपारंब्या, छप्पीचा खेळ, झोपाळे आदी खेळांचा समावेश होता.
बालपणी खेळले गेलेले खेळ पुन्हा खेळताना नव्या पिढीला तंत्रज्ञानाच्या खेळापेक्षा हे बिनखर्चिक आणि निखळ आनंद देणारे खेळ समजावून दिले पाहिजेत अशी भावना कार्यक्रमात सहभागी महिलांमध्ये व्यक्त होताना दिसत होती. अपना बचपन कार्यक्रमासंदर्भात जितो लेडीज विंगच्या फेब्रुवारी ग्रुपच्या मेंटॉर उज्वला मोहता यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ला अधिक माहीती दिली.
‘अपना बचपन’ हा आगळावेगळा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा भारती हारदी व सचिव किवीशा दोशी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. दुपारी सहभोजन आणि सायंकाळी चहापान झाल्यानंतर दिवसाखेर वंदेमातरमने जशी शाळा सुटते तशी वंदे मातरम् गीताने आजच्या या अपना बचपन कार्यक्रमाची सांगता झाली.