शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्र गेल्या 2018 19 सालासह गेल्या दोन-अडीच वर्षे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात आम्हाला जे यश मिळाले त्याला मुख्यत्वे करून शहापूर भागातील नागरिकांचे सहकार्य कारणीभूत आहे, अशी प्रांजळ कबुली एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी दिली.
पत्रकार विकास अकादमीतर्फे रविवारी सकाळी नेहरूनगर येथील अकादमीच्या कार्यालयात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी आपल्या सत्काराला उत्तर देताना पोलीस अधिकारी मुशाफिरी बोलत होते. पोलीस आयुक्तालयातर्फे गेल्या दोन-अडीच वर्षात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात अत्यंत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या शहापूर पोलीस स्थानकाला यंदाचा “उत्कृष्ट पोलीस स्थानक” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार मिळवून देण्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांचे कौशल्यपूर्ण काम कारणीभूत होते. याची दखल घेऊन पत्रकार विकास अकादमीतर्फे रविवारी सध्या एपीएमसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक असणाऱ्या जावेद मुशाफिरी यांच्यासह महिलांच्या 40 वर्षांवरील गटात तब्बल 30 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बक्षिसे मिळणाऱ्या बेळगावच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना जावेद मुशाफिरी म्हणाले की, शहापूर पोलीस स्थानकाला आता जो पुरस्कार मिळाला आहे त्याचे श्रेय पोलिसांबरोबरच शहापूरवासियांना जाते. गेल्या काही वर्षापूर्वी जातीयता नावामुळे बेळगावातील परिस्थिती चांगली नव्हती. त्यावेळी शहापूर येथील नेताजी जाधव दिपक जमखंडी सव्वाशेर आदींसह पंच मंडळी व जेष्ठ नागरिक आणि पोलिस खात्याला उत्तम सहकार्य केले. गणेशोत्सव शिवजयंती या काळात ही मंडळी त्यांचे काम नसतानाही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून सहकार्य करताना पहाटेपर्यंत जागत होती. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला उत्तम कार्य करायचे असेल तर त्याला स्थानिक जनतेचे सहकार्य मिळणे गरजेचे असते असे सांगून तत्कालीन जातीय तणावाची परिस्थिती आणि आपण केलेल्या उपाययोजना याबाबत जावेद मुशाफिरी यांनी माहिती दिली.
सदर समारंभात तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते पोलीस अधिकारी जावेद मुशाफिरी आणि नामवंत जलतरणपटू ज्योती होसट्टी यांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नेताजी जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांची सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली. कार्यक्रमास पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद प्रभू, सचिव उमेश मजुकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे, रमेश हिरेमठ नेताजी जाधव, प्रकाश बेळगोजी, वैजनाथ पाटील आदींसह पत्रकार विकास अकादमीचे अन्य सदस्य निमंत्रित आणि विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.