मंगळवारी रात्री अनगोळ येथे दोन गटातील वादानंतर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर हाणामारीचा प्रकारही घडला आहे. एकमेकावर केलेल्या तुफान दगडफेकीनंतर अनगोळ परिसरात एकच खळबळ माजली. अचानक दगडफेक झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
या घटनेत सुरज सुरेश डिजे वय30 राहणार रघुनाथ पेठ आणि आकाश शंकर झगरूचे वय 23 राहणार पाटील गल्ली अनगोळ हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर संकेत सोरटेकर वय 23 राहणार राजहंस गल्ली हा युवक गंभीर झाल्याने त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले आहे.
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अनगोळ येथे सुरू असलेल्या मरगाई देवी यात्रेनिमित्त ठिकाणी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीदरम्यान लावण्यात आलेल्या डॉल्बी मुळे हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्याचे पर्यावसन दगडफेकीत झाले. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. वारंवार होत असलेल्या या घटनांमुळे नागरिक भयभीत झाल्याचेही दिसून येत आहे.
डॉल्बी मुळे हा वाद विकोपाला गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीहल्ला केल्याचेही सांगण्यात येत आहे. अनगोळ तसेच परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे.