टिळकवाडी येथील टिळकवाडी पोलीस स्थानकाशेजारील आपल्या मंदिराच्या जागेच्या लीजचे नूतनीकरण करावे किंवा संबंधित जागा आपल्याला खरेदी द्यावी अशी मागणी टिळकवाडीतील अहिर गवळी समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अहिर गवळी समाज मंगळवारपेठ, टिळकवाडीचे अध्यक्ष अॅड. धनराज गवळी आणि सचिव राजू गवळी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. टिळकवाडी येथे सध्याच्या टिळकवाडी पोलीस स्टेशन शेजारील जागेमध्ये अहिर गवळी समाजाचे मंदिर आहे. गेल्या सुमारे दीडशे वर्षाच्या पूर्वीपासून सदर मंदिर याठिकाणी अस्तित्वात आहे. गेल्या 1998 साली गोविंदराव राऊत हे महापौर असताना महानगरपालिकेने सदर जागा आपल्या ताब्यात घेऊन प्रत्येकी 10 गुंठे याप्रमाणे ती जागा अहिर गवळी समाज आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाला विभागून दिली आहे. अहिर गवळी समाजाला सदर जागा लीजवर वापरण्यास दिली होती. या लीजचा कालावधी 2003 साली समाप्त झाल्यानंतर गवळी समाजाने वेळोवेळी मागणी करूनही लीजचे नुतनीकरण करण्यात आले नाही. अलीकडे सदर मंदिराचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून स्लॅब टाकण्याची तयारी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर आता नव्या कायद्यानुसार महापालिकेकडून अनाधिकृत मंदिरे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे गवळी समाजाचे फार पूर्वीपासूनचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचे आणि मंदिराच्या जागेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तेंव्हा याप्रकरणी त्वरित लक्ष घालून मंदिर जागेच्या लीजचे नूतनीकरण करून दिले जावे किंवा संबंधित जागा खरेदी द्यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी रोहन गवळी, मनोहर भवानी, प्रकाश भवानी, पिराजी चौधरी, कमलू गवळी आदींसह अहिर गवळी समाज बांधव विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.