सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत बेळगावात चित्रकार कलामहर्षी के बी कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळा दिनांक चार ते सहा फेब्रुवारी सलग तीन दिवस होणार असून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
अनेक चित्रकारांचे प्रेरणास्थान आणि ख्यातनाम चित्रकार बेळगाव भूषण कलामहर्षी के. बी. कुलकर्णी यांचे नाव कलाक्षेत्रात मोठ्या आदराने घेतले जाते. बेळगाव ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. 2020 हे वर्ष के. बी. कुलकर्णी यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. कलामहर्षी के.बी. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त बेळगावात दिनांक 4 ते 6 फेब्रुवारीदरम्यान विविध कलात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जन्मशताब्दी सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कलामहर्षी के बी कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळा समितीचे कार्यकारी प्रमुख जगदीश कुंटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त माहिती देताना ते म्हणाले मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघ येथे के. बी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या आर्ट गॅलरी आणि चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या चित्रप्रदर्शनात चित्रकला स्पर्धेतील 40 निवडक तसेच जैन भंडारी स्कूलच्या विद्यार्थ्यांची चित्रे ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे अभिनेते नाना पाटेकर जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन करतील.यावेळी कलामहर्षी के. बी. कुलकर्णी स्मृतीग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल. सायंकाळच्या सत्रात प्रख्यात चित्रकार रवी परांजपे यांच्या लघुपटाचे प्रदर्शन व त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याचवेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विकास पाटणकर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी नाना पाटेकर प्रमुख वक्ते म्हणून आपले मनोगत मांडणार आहेत.
बुधवार दिनांक 5 रोजी सकाळी साडेदहा वाजता लोकमान्य रंगमंदिरात चित्र कसे वाचावे या विषयावर डॉक्टर गोविंद काळे(गोवा),चंद्रकांत जोशी (कोल्हापूर) व मारुती पाटील (पुणे) यांच्यासह चित्रकार विद्यार्थिआपले मनोगत मांडणार आहेत. दुपारच्या सत्रात वासुदेव कामत मुंबई यांच्या चित्रांचे प्रात्यक्षिक होईल. याच वेळी जन्मशताब्दी सोहळा निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात येतील. मर्यादा पुरुषोत्तम या स्लाईडशो चे वासुदेव कामत सादरीकरण करतील.
गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी संकल्प भूमी जैतनमाळ येथे जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ होईल. दिवसभर चालणाऱ्या या समारंभात पंचवीस निमंत्रित चित्रकारांचे प्रात्यक्षिक होईल. यावेळी भास्कर तिकडे मुंबई व ललित कला केंद्र नवी दिल्ली चे अध्यक्ष डॉक्टर उत्तम पाचारणे उपस्थित राहणार आहेत. बेळगाव आणि परिसरातील चित्र प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला चित्र रसिकांनी आणि बेळगावच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दर्शवा असे आवाहनही यावेळी जगदीश कुंटे, प्रा. अनिल चौधरी किरण हणमशेठ यांनी केले.