या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अखंडपणे लढत राहीन प्रसंगी मृत्यू आला तरी पर्वा करणार नाही, अशी प्रतिज्ञा घेऊन या प्रतिज्ञेला स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शेवटपर्यंत जागले. असा महानायक भारतात जन्मला हे आपले भाग्य होय, परंतु आजही अनेकांना खऱ्या अर्थाने सावरकर समजले नाहीत. त्यासाठी आपण सावरकर यांचे विचार पोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक योगेश सोमण यांनी सांगितले
सालाबादप्रमाणे सरस्वती वाचनालयातर्फे आयोजित स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमालेला आज सोमवारपासून प्रारंभ झाला. डॉ. शकुंतला गिजरे सभागृहामध्ये आज सायंकाळी या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना “स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर” या विषयावर प्रमुख वक्ता यानात्याने पुण्याचे योगेश सोमण बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार, प्रमुख पाहुण्या प्रा. माधुरी शानभाग, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, गणेशवाडी व विश्वस्त सुभाष इनामदार व्यासपीठावर उपस्थित होते. पहिले पुष्प गुंफताना वीर सावरकर यांचा जन्म, चाफेकर बंधूंना फाशी, सावरकरांचा विवाह, हिंदुराष्ट्र मेळ्याची स्थापना आणि विदेशी कपड्यांची होळी इथपर्यंतचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रवास योगेश सोमण यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत कथन केला.
यावेळी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांनी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही देऊन व्याख्यानमालेला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विनायक मोरे यांनी शारदा स्तुती व स्वातंत्र्य गीत गायन केले. त्यानंतर प्रमुख वक्ते योगेश सोमण व रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन आणि या उभयतांसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्याद्वारे व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.
यावेळी सुभाष इनामदार व सुहास सांगलीकर यांच्या हस्ते मंत्री सुरेश अंगडी आणि योगेश सोमण यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे व्याख्यानमालेचे औचित्य साधून सौ. मेधा खांडेकर यांच्या हस्ते प्रा. स्वरूपा इनामदार आणि चित्पावन ब्राह्मण संघ बेळगाव तर्फे योगेश सोमण यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका केळकर यांनी केले. व्याख्यानमालेस सावरकर प्रेमींसह बहुसंख्य श्रोते उपस्थित होते.