विश्वेश्वरय्यानगर येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेळगाव जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे यांचा अवमान झाल्याची आणि त्या समारंभ अर्ध्यावर सोडून निघून गेल्याची घटना बुधवारी घडल्याने हा एक चर्चेचा विषय झाला होता.
शहरातील विश्वेश्वरय्यानगर येथे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल केंद्राचा उद्घाटन समारंभ आज बुधवारी पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन समारंभास रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, खासदार प्रभाकर कोरे, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, महांतेश कवटगीमठ, दुर्योधन ऐहोळे आदी लोकप्रतिनिधींसह बेळगाव जिल्हा पंचायत अध्यक्षा आशा एहोळे यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच सर्व मान्यवर त्यांच्यासमवेत समारंभस्थळी जात असताना एकच घाईगडबड व गर्दी झाली. या गर्दीमुळे जि. पं. अध्यक्षा आशा एहोळे थोड्या मागे राहिल्या. त्या समारंभाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत सर्व आसनांवर निमंत्रित पाहुणे आणि मान्यवर मंडळी विराजमान झाली होती. परिणामी आशा एहोळे यांना बसण्यासाठी आसन शिल्लक राहिले नसल्यामुळे त्या एका बाजूला उभ्या राहिल्या. यावेळी समारंभाचे आयोजक अथवा उपस्थित अधिकाऱ्यांपैकी एकाने देखील एहोळे यांच्यासाठी आसन व्यवस्था करण्याचे कष्ट घेतले नाहीत. या अवमानकारक वागणुकीमुळे संतप्त झालेल्या जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे समारंभ अर्ध्यावर सोडून तेथून बाहेर पडल्या. हा प्रकार काही जणांच्या लक्षात येताच त्यांनी आयोजकांना त्याबाबत माहिती दिली, परंतु तोपर्यंत दुखावलेल्या आशा एहोळे समारंभाच्या ठिकाणाहून निघून गेल्या होत्या.
बेळगाव जिल्हा पंचायत ही राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असून अशा या जिल्हा पंचायतीच्या अध्यक्षांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अवमानकारक वागणूक देण्याचा प्रकार घडल्यामुळे तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सध्या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि आशा एहोळे या काँग्रेस पक्षाच्या आहेत. यामुळेच विश्वेश्वरय्यानगर येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जाणीवपूर्वक त्यांना अवमानकारक वागणूक देण्यात आली असावी असे बोलले जात आहे. तसेच सदर समारंभाप्रसंगी जि. पं. अध्यक्षा आशा एहोळे यांना बसण्यासाठी आसन उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांनी राजकीय शिष्टाचारचा भंग केला असल्यामुळे संबंधितांवर कारवाई केली जावी अशी मागणीही केली जात आहे.