सालाबाद प्रमाणे येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना देण्यात येणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. येळ्ळूर साहित्य संमेलना दिवशी येत्या 2 फेब्रुवारी रोजी सदर पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्यावतीने यंदाचा ‘राष्ट्रवीर’ कार शामराव देसाई साहित्य पुरस्कार धारवाडचे डॉ. अमृत यार्दी यांना देण्यात येणार आहे. कै. मारुती पाटील (पेंटर) सामाजिक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कॉ. कृष्णा शहापूरकर यांना, रमाबाई आंबेडकर महिला सामाजिक पुरस्कार पुण्याच्या कॉ. मेधा सामंत यांना, गुरुवर्य गावडोजी पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार येळ्ळूरच्या शोभा निलजकर यांना, क्रीडा पुरस्कार उमेश मजूकर यांना तर विद्यार्थी क्रीडा पुरस्कार कार्तिक शिवाजी गोरल याला दिला जाणार आहे.
डॉ. अमृत यार्दी यांचा जन्म आणि संपूर्ण शिक्षण धारवाडमध्ये झाले आहे. डॉ. यार्दी यांनी भाषांतराची अनेक कामे केली असून त्यांना पांच भाषा अवगत आहेत त्यांची एकूण 11 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारतीय भाषांचा तुलनात्मक अभ्यास करणे हा त्यांचा छंद असून त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कॉम्रेड कृष्णा शहापूरकर हे बेळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत व्यक्तिमत्व आहे. कृष्णा शहापूरकर हे 1969 पासून साम्यवादी साप्ताहिकाचे सहसंपादक म्हणून तसेच तरुण भारत दैनिकाचे 30 वर्षे उपसंपादक म्हणून काम पाहतात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कार्यकारणी चे ते सदस्य आहेत. त्याचप्रमाणे बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य देखील आहेत.
डॉ. मेधा सामंत या पुण्याच्या अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख असून त्या मूळच्या मुंबईच्या आहेत. बीए पदवी संपादन केल्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करणाऱ्या डॉ. सामंत यांनी 1994 साली नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर पुण्यातील अन्नपूर्णा महिला मंडळाचे कार्य सुरू केले. या मंडळाच्या माध्यमातून सावकारी कर्जातून महिलांना मुक्त करण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य पुरविले. पुणे व मुंबई येथील लाखाहून अधिक महिलांना त्यांनी कर्ज वाटप केले आहे. झोपडपट्टीत पाळणाघरे व बालवाड्या सुरू केल्या आहेत. ‘उंच माझा झोका’ या महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारासह डॉक्टर मेधा सामंत यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उमेश मजुकर हे केएलएस इंग्रजी शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवा बजावत असून पुढारी दैनिकांचे क्रीडा प्रतिनिधी देखील आहेत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी व शरीरसौष्ठव या क्रीडा क्षेत्रांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. क्रिकेट व फुटबॉलचे पंच म्हणून ते सुपरिचित आहेत.