म्हादईच्या पाणी प्रश्नावरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा हे दिल्ली मुक्कामी चर्चा करणार आहेत.कर्नाटक राज्याला म्हादईच्या पाण्याची आवश्यकता आहे., आणि म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. म्हादई नदीचा जो वादग्रस्त भाग आहे तो महाजन कमिशननुसार महाराष्ट्रात आहे, म्हणून येडीयुरप्पा हे कर्नाटक गोवा पाणी वाटपा वरून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगाव दौऱ्यावर असताना येडीयुरप्पा यांनी दिल्लीत आपण उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू अशी पत्रकारांना माहिती दिली होती.
कर्नाटक पाणी प्रश्नावरून आक्रमक असले, तरी ठाकरे सरकार सीमा प्रश्नाच्या बाबतीत आग्रही आहे. महाराष्ट्रातील सरकार स्थापने पासून महा विकास आघाडीने बेळगावप्रश्नी सकारात्मक पावले उचलली आहेत. नुकतेच सामनाचे संपादक संजय राऊत यांनी बेळगाव प्रश्नी उद्धव ठाकरे आणि बी एस येडीयुरप्पा यांच्यात चर्चा व्हावी यासाठी प्रयत्न करू, याशिवाय उभयतांत शिखर परिषद व्हावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. त्या नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे ठाकरे यांच्याशी चर्चा करू असे वक्तव्य राऊत यांच्या प्रयत्नांना बळ देणारं आहे.
या व्यतिरिक्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकाशी चर्चा करावी अशी मागणी केली होती. हे सगळं घडणार आहे का याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आजवर महाराष्ट्रात अनेक पक्ष्यांच्या सत्ता आल्या पण महा विकास आघाडीने उचललेल्या पावलाने बेळगाव परिसरातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.पाणी असो अगर भाषा असो ती प्रवाही असते त्याची अडवणूक करणे हे असुसंस्कृत पणाचे लक्षण आहे. पाणी व भाषा सुदृढ लोक जीवनासाठी आवश्यक आहेत, त्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे.
मानवतेच्या भावनेतून पाणी प्रश्नावर जर चर्चा होणार असेल, तर त्याच मानवतेच्या भावनेतून कर्नाटक प्रशासन बेळगावातील जनतेशी जी अमानवीय वर्तणूक करतंय त्याची देखील चर्चा होणारच..