अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करणारे सीमाभागातील मराठी भाषिक मराठी साहित्याचे सीमेवरील खरे रक्षक आहेत, असे उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काढले.
उचगांव मराठी साहित्य अकादमीतर्फे आयोजित 18 वे उचगांव मराठी साहित्य संमेलन रविवारी उत्साहात पार पडले. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांना महाराष्ट्र शासनाने भरघोस अर्थसहाय्य दिले पाहिजे. तसेच ते दिले जावे यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषद निश्चितपणे करेल. सीमाभागातील मराठी भाषिक हे मराठी साहित्याचे सीमेवरचे रक्षक आहेत असे सांगून सीमावासियांना उद्देशून बोलताना मिलिंद जोशी म्हणाले की, तुम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम अव्याहत करत आहात. आपण सर्वांनी मराठी भाषेचा झेंडा डौलाने फडकवत ठेवला आहे. तेंव्हा आम्ही जरी महाराष्ट्रात असलो तरी तुम्ही जे माय मराठी भाषेसाठी करता आहात ते पाहून आमचा उर अभिमानाने भरून येतो आणि वाटतं की महाराष्ट्रातील लोकांनी आपले आत्मपरीक्षण करावे, असे जोशी म्हणाले.
सन्माननीय अतिथी या नात्याने बोलताना सीमावासियांचे आत्मीय व्यक्तिमत्व बनलेले चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा सीमाप्रश्नाबाबतची आपली कळकळ व्यक्त केली. सीमाप्रश्नासाठी माझे वडील नरसिंह गुरुनाथ पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांची जाणीव ठेवून मी सातत्याने सीमाप्रश्न निकालात लावण्यासाठी प्रयत्नशील राहीण अशी ग्वाही त्यांनी दिली. वडिलांपासून प्रेरणा घेऊन मी माझ्या शपथविधी समारंभाप्रसंगी सीमावासियांना स्मरून शपथ घेतली. त्याचा योग्य परिणाम झाला असून आता महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांमध्ये सीमाप्रश्नाला अग्रक्रम दिला जात असल्याचे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. उचगांव मराठी साहित्य संमेलनात सीमाप्रश्नी जो ठराव मांडण्यात आला आहे त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी हे या भागाचा एक प्रतिनिधी म्हणून मी माझे आद्य कर्तव्य समजतो, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
उचगांव येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौकातील गणेश, विठ्ठल- रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून समारंभपूर्वक साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीचा शुभारंभ झाला. झुवारी कंपनी गोव्याचे आर. वाय. पाटील यांच्या हस्ते गणेश पूजन, सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्या हस्ते विठ्ठल रखमाई पूजन, डॉ. प्रवीण देसाई यांच्या हस्ते श्री राम पूजन आणि डॉ. ज्ञानेश्वर कोवाडकर यांच्या हस्ते पालखी पूजन झाल्यानंतर ग्रंथ दिंडीला प्रारंभ झाला.
गावातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या या सवाद्य ग्रंथदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ग्रंथदिंडीत सहभागी भजनी मेळे, झांज व ढोल पथके, लेझीम पथके यांचा उत्साह ओसंडून वहात होता. गावातील प्रमुख मार्गावरून फिरून सदर ग्रंथदिंडीची उचगांव मळेकरणी देवीच्या आमराईतील संमेलन स्थळी सांगता झाली. याप्रसंगी डॉ. मोहन पावशे यांच्या हस्ते मळेकरणी देवीचे पूजन झाले. त्यानंतर बेळगाव जिल्हा पंचायतीच्या शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांच्या हस्ते पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. संमेलनाच्या सभामंडपाचे उद्घाटन राजेंद्र बाडीवाले यांनी केले. तसेच व्यासपीठाचे उद्घाटन महादेव तरळे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संमेलनाध्यक्षांसह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर साहित्य संमेलन चार सत्रात संपन्न झाले. पहिल्या सत्रात उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात के. एम. अग्रवाल महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक प्रशांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यावेळी प्रशांत मोरे यांनी ‘आई एक महाकाव्य’ यावर कवितांचे सादरीकरण केले. दुसऱ्या सत्रानंतर वनभोजनाचा कार्यक्रम झाला.
वनभोजनानंतर तिसऱ्या सत्रात संगमनेर येथील ह.भ.प. राजेंद्र महाराज येवले यांचे ‘संत साहित्य’ या विषयावरील विनोदी शैलीत व्याख्यान झाले. चौथ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये ‘हसायदान’ हा विनोदी कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाला. या कार्यक्रमात फलटणच्या प्रेमलाताई चव्हाण ज्युनिअर कॉलेजचे रवींद्र कोकरे यांनी विनोदी कथाकथन सादर केले. उचगाव मराठी साहित्य संमेलनास महिलावर्गासह आबालवृद्ध साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.