तुरमुरी कचरा डेपो येथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या ठिकाणी कराराचे उल्लंघन करून सुरु असलेला ज्यादा कचरा टाकण्याचा प्रकार येत्या 8 दिवसात बंद करावा अन्यथा महापालिकेसमोर धरणे सत्याग्रह करण्यात येईल, असा इशारा तुरमुरी ग्रामपंचायत आणि समस्त ग्रामस्थांनी दिला आहे.
तुरमुरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने गुरुवारी एका निवेदनाद्वारे हा इशारा देण्यात आला. तुरमुरी ग्रामपंचायत अध्यक्ष रामू खांडेकर व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन मनपा आयुक्त उपलब्ध नसल्याने पालिकेच्या पर्यावरण अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. कचरा विल्हेवाट लावणाऱ्या कंपनीशी केलेल्या करारानुसार तुरमुरी कचरा डेपो येथे दररोज 100 टन कचरा टाकला गेला पाहिजे.
तथापि सध्या सुमारे 275 टन कचरा याठिकाणी आणून ओतला जातो. परिणामी प्रक्रियेसाठी आवश्यक 100 टन कचरा वगळता उर्वरित कचरा मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. त्यामुळे संपूर्ण तुरमुरी गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तेंव्हा आता येत्या 8 दिवसात प्रक्रियेसाठी आवश्यक कचरा वगळता उर्वरित कचरा तुरमुरी कचरा डेपोमध्ये टाकणे बंद न झाल्यास बेळगाव महापालिकेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी माजी ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मण डिको जाधव माजी एपीएमसी अध्यक्ष अप्पा जाधव, भाऊ पाटील, बंडू कुद्रेमनीकर, पुंडलिक पावशे, मल्लाप्पा तंगनावर, तुकाराम तुप्पट, बाबू बेळगुंदकर, किरण जाधव यांच्यासह तुरमुरी ग्रामस्थ उपस्थित होते.