बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक लवकरात लवकर घेऊन स्मार्ट सिटीच्या नावाखाली होत असलेली बेळगाव शहराची वाताहत थांबवावी. तसेच वॉर्ड रचना करताना नागरिकांना विश्वासात घ्यावे, अशा मागणीचे निवेदन आज सोमवारी माजी नगरसेवक संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
माजी नगरसेवक संघटना बेळगावचे अध्यक्ष माजी महापौर ॲड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सादर केलेले निवेदन स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिले. बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन दोन वर्षे झाली आहेत. त्यानंतर नव्याने निवडणुक झालेली नाही. सध्या बेळगाव शहर अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहर उधवस्त केले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि सर्वांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींची अत्यंत गरज आहे. विकासाच्या नावाखाली सध्या शहरातची जी वाताहत केली जात आहे याकडे दुर्देवाने सध्याच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे. सध्या शहरात अनेक समस्या निर्माण झाल्यास त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्या-त्या वॉर्डात त्यांचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक त्वरित घेतली जावी. बेळगाव महानगरपालिका ज्यावेळी बरखास्त झाली. त्यावेळी दावणगिरी, गुलबर्गा आदी महापालिकांचाही कालावधी संपुष्टात आला होता. तथापि तेथील निवडणुका लगेच घेण्यात आल्या. तेंव्हा बेळगावच्या बाबतीत सापत्नभाव न दाखवता येथील निवडणुकाही घेतल्या जाव्यात. तसेच निवडणुकीसाठी वार्ड रचना करताना नागरिकांना विश्वासात घेतले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर अॅड. नागेश सातेरी यांनी निवेदन सादर करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सध्या बेळगावची दुर्दशा केली जात आहे. याबाबत नागरिक माजी नगरसेवकांना जाब विचारत आहेत. आम्ही नागरिकांना काय उत्तर द्यायचे अशी सर्व माजी नगरसेवकांची व्यथा आहे. शहराची वाताहत थांबवायची असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींची अत्यंत गरज आहे. यासाठीच महानगरपालिकेची निवडणूक त्वरित घ्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री पर्यायाने कर्नाटक सरकारकडे केली असल्याचे ॲड. सातेरी यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करणाऱ्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळात सरचिटणीस दीपक वाघेला, संयुक्त सचिव नेताजी जाधव,किरण सायनाक,वकील नागेश सातेरी,मालोजी अष्टेकर, नीलिमा पावशे,वर्षा आजरेकर,संजीव प्रभू ,राजन हुलबत्ते,नेताजी जाधव,सतीश गोरगोंडा आदींचा समावेश होता.