गेल्या काही दिवसांपासून टिळकवाडी येथील काँग्रेस रोडवरील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे गेटनजीक कांही बेळगाव स्टाईल स्वदेशी बनावटीचे पेव्हर्सचे उंचवटे किंवा ज्याला आपण स्पीडब्रेकर म्हणतो ते बनवले जात आहेत. या अनावश्यक बुचकळ्यात टाकणाऱ्या स्पीडब्रेकर्सबद्दल सध्या सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
गोगटे सर्कलकडून येणाऱ्या वाहनांसाठी पहिल्या रेल्वे गेट येथे स्पीडब्रेकर आवश्यक आहे हे एक वेळ ठीक आहे. कारण रेल्वे गेटमधून येणारी वाहने काँग्रेस रोडवर संथ गतीने प्रवेश करत असतात, परंतु रेल्वे गेट ओलांडल्यानंतर गेटासमोरील फाट्यावर (टी जंक्शन) पुन्हा एका बुचकळ्यात टाकणाऱ्या उंचवट्याची (स्पीडब्रेकर) काय गरज आहे? गोगटे सर्कलकडून दुसऱ्या रेल्वे गेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग पहिल्या स्पीडब्रेकरनंतर आधीच कमी झालेला असतो असे असताना वाहनांची रांग वाढविणारा दुसरा स्पीडब्रेकर कशासाठी हवा? असा सवाल केला जात आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
हाच प्रकार या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्वीटमार्टनजीक पहावयास मिळतो. या ठिकाणी रॉय रोड फाट्यावरील स्पीडब्रेकर गरजेचा आहे, परंतु त्याच्या पुढे आणखीन एक स्पीडब्रेकर तयार करण्यामागील प्रयोजन लक्षात येत नाही.
सुज्ञ नागरिक आणि वाहनचालक अजूनही विचारात पडले आहेत की संबंधित ठिकाणी अनावश्यक बुचकळ्यात टाकणारे स्पीडब्रेकर बनवण्याची कल्पना कुठल्या महाभागाने सुचविली असावी? दरम्यान, या अनावश्यक स्पीडब्रेकर्सबद्दल वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.