येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र आनंद चिट्टी आणि सौ. निर्झरा चिट्टी या चिट्टी दाम्पत्यांचा रामतीर्थ- आजरा येथे गोथामूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्यावतीने ‘समाज भूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्तुर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील वारकरी सेवा प्रतिष्ठानचे गोथामूर्ती सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्यातर्फे हे दरवर्षी रामतीर्थ- आजरा येथे एक दिवशीय हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. या हरिनाम सप्ताहचे औचित्य साधून श्री क्षेत्र आळंदी देवाची येथील ह.भ.प. गुरुवर्य डाॅ. श्री. यशोधन किसनमहाराज साखरे यांच्या हस्ते सर्पमित्र आनंद चिट्टी व निर्झरा चिट्टी यांना समाज भूषण पुरस्कार गौरवपत्र, शाल, श्रीफळ व रोख 5 हजार रुपये देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात आले. याप्रसंगी गोथामूर्ती सद्गुरू श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्यासह अन्य मान्यवर आणि आणि बहुसंख्य वारकरी तसेच हितचिंतक उपस्थित होते.
येळ्ळूर येथील सर्पमित्र आनंद चिट्टी हे पर्यावरण व वन्य प्राण्यांचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन कोणाचेही प्रोत्साहन किंवा मार्गदर्शन नसताना आपल्याकडून वसुंधरेची व समाजाची कांही सेवा घडावी या उदात्त हेतूने अगदी शालेय जीवनापासून सर्पमित्र म्हणून काम करत आहेत. गेल्या 20 वर्षांत त्यांनी विविध जातींच्या 16 हजारपेक्षा जास्त सापांना पकडून त्यांना जीवदान देताना सुरक्षित अधिवासात सोडून दिले आहे. आपल्या पत्नी सौ निर्झरा यांनाही त्यांनी सतत पाच वर्षे प्रशिक्षण देऊन साप पकडण्यात तरबेज केले आहे. सौ निर्झरा चिट्टी यांनी देखील विमा कंपनीतील आपली चांगली नोकरी सोडून आपल्या सर्पमित्र पतीला सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या 7 वर्षांपासून विविध जातींचे साप पकडणाऱ्या निर्झरा चिट्टी या कर्नाटक राज्यातील ‘पहिल्या महिला सर्पमित्र’ आहेत. पतीच्या मदतीशिवाय त्यांनी स्वतः एकट्याने आजपर्यंत रात्री-अपरात्री जाऊन 1700 हून अधिक सापांना पकडून जीवदान दिले आहे. सर्पमित्र आनंद चिट्टी यांनी शेतकऱ्यांपासून शालेय विद्यार्थ्यांपर्यंत आणि सामान्य गृहिणीपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत सर्वांना सापाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी आजपर्यंत 720 पर्यावरण व सर्प विषयक व्याख्याने आणि कार्यशाळांचे आयोजन केले आहे. ‘सर्प परिचय’, ‘फिर भी डर लगता है’ आणि ‘सर्प मानवी गैरसमजुतीच्या विळख्यात’ हि आनंद चिट्टी यांनी लिहिलेली लिहिलेली पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्पमित्र आनंद चिट्टी व सौ. निर्झरा चिट्टी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.