1947 साली स्वातंत्र्य मिळालं पण सरकारची चामडी तेव्हढी बदलली बाकी तसंच राहीलं. हिंदू म्हणजेच सेक्युलर (निधर्मी) हा शब्दच चुकीचा आहे, प्रत्येक गोष्टीचा धर्म असतो. माणुसकीनं वागणं म्हणजेच हिंदू असणं.बाकीच्या साऱ्या धर्म संस्था आहेत, असे परखड मत जेष्ठ मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे आज रविवारी सकाळी हिंदवाडीतील गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वेणूगोपाल सभागृहामध्ये आयोजित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान देताना शरद पोंक्षे बोलत होते. आपल्या व्याख्यानात पोंक्षे पुढे म्हणाले की, आपल्या रामायणात महाभारतात अब्दुल्ला, फर्नांडीस असे शब्द सापडत नाहीत कारण त्यावेळी असे शब्दच अस्तित्वात नव्हते. हिंदू धर्म कोणी, केंव्हा सुरु केला माहीत नाही, वसुधैव कुटुंबकम् हा आपला विचार. हिंदू म्हणजेच सेक्युलर अर्थात निधर्मी हा शब्दच चुकीचा आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा धर्म असतो. माणुसकीनं वागणं म्हणजेच हिंदू असणं. बाकीच्या साऱ्या धर्म संस्था आहेत. संस्था म्हटल्यावर चौकट येते, नियम येतात हिंदु धर्म संस्था नाही. हिंदू धर्माची अशी व्याख्या सांगत पंडीत नेहरुपासून आजपर्यंत काँग्रेसनी सतत कसा सावरकरांचा दुस्वास केला,रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं असा खोटा प्रचार करीत क्रांतीकारकांना डावलल, सावरकरांनी बोटीतून घेतलेल्या उडीची सविस्तर कहाणी, पाठ्यपुस्तकातून चुकीचा शिकविला जाणारा इतिहास, म.फुले, डाॅ. आंबेडकर यांच्याप्रमाणेच जात्युच्छेदनसाठी ब्राम्हण असूनही सावरकरांनी केलेले प्रयत्न विसरुन त्यांना सतत ब्राह्मण म्हणून सतावलं जाणं. गाय हा उपयुक्त पशू, पशू म्हणजे देव नव्हे. अंदमानात पोहोचताच इथे आपल्या देशाचे आरमार असावे हा राष्ट्राचा सतत विचार, शिवाजी,श्रीकृष्ण ही प्रेरणा आणि तसंच वागणं हे लक्षात घेता वीर सावरकर समजायला कठीण आहेत. गंगेच यमुनेचैव असं आपण म्हणतो आपण इथलेच आहोत हे आपल तीर्थक्षेत्र आहे. आपले संत आपलेच आहेत.1947 साली स्वातंत्र्य मिळालं पण सरकारची चामडी तेव्हढी बदलली बाकी तसंच राहीलं, असे मत शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात व्यक्त केले.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे अध्यक्ष वीरधवल उपाध्ये यांनी वक्त्यांचे आणि उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख वक्ते ज्येष्ठ सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचा परिचय अशोक नाईक यांनी करून दिला. व्याख्यानाच्या अखेरीस वेंकटेश देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले. शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाला नागरिकांनी गर्दी केली होती त्यामुळे सभागृह भरून गेले होते.