सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सतत प्रयत्नशील असणारे, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केलेले आणि या प्रश्नाची खडानखडा माहिती असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने कोर्टाच्या बाहेरही सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्याच्या दृष्टीने आपण मा. पवारसाहेबांना विनंती करू, अशी ग्वाही शिवसेनेचे राज्यसभेचे सदस्य खासदार संजय राऊत यांनी शहापूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
काकतीनजीकच्या हॉटेल फेअर फिल्ड मेरीओट येथे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व म. ए. समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नेताजी जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार संजय राऊत यांची सीमाप्रश्नी भेट घेतली असता त्यांनी उपरोक्त ग्वाही दिली
महाराष्ट्र सरकारने 14 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी दावा दाखल केलेला आहे. परंतु अद्याप त्याचा निर्णय होऊ शकलेला नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने हा खटला ऐकून घेण्यासाठी जे तीन न्यायाधिशांचे पॅनेल नेमले आहे, या पॅनेलमध्ये कधी महाराष्ट्राच्या न्यायाधीशांचा समावेश असतो तर कधी कर्नाटकाच्या न्यायाधीशांचा समावेश असतो, परिणामी हा खटला लांबणीवर पडत आहे. शिवाय कधी केंद्रसरकार आपले म्हणणे मांडत नाही तर कधी कर्नाटक तारखा घेण्यास पुढाकार घेत असतो. त्यामुळे आतापर्यंत हा खटला पुढे सरकू शकलेला नाही. इतर वेळी काही तातडीने दाखल केलेले खटले सर्वोच्च न्यायालय रात्रीचे कोर्ट भरवून त्याची सुनावणी करते, मग आमच्या बाबतीत असे का? तेंव्हा न्यायालयीन कामकाजाच्या त्रुटींकडे लक्ष घालून आपल्या खासदारकीच्या माध्यमातून काय करता येईल याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी विनंती केली असता खासदार संजय राऊत बोलत होते.
महाजन अहवाल गाडला गेलेला असताना आजही कर्नाटकातील सर्वपक्षीय नेते महाजन अहवालाप्रमाणे सीमाप्रश्न सुटावा अशी हास्यास्पद मागणी करत आहेत. याकडे खासदार राऊत यांचे लक्ष वेधले असता, पूर्वी महाजन अहवाल लोकसभेत मांडण्यात आल्यानंतर माजी केंद्रीय मंत्र्यांनी व दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जे काही नवी तोडगे मांडले, त्या तोडग्यांचा अभ्यास करून माननीय शरद पवार साहेबांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार मी निश्चित प्रयत्न करेन, असे ठाम आश्वासन खासदार संजय राऊत यांनी दिली.
फेअर फील्ड मेरीओट येथे खासदार राऊत यांची भेट घेणाऱ्या शहापूर विभाग म. ए. समितीच्या शिष्टमंडळात नेताजी जाधव यांच्यासह अनंत जांगळे, विजय जाधव आदींचा समावेश होता