कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित 47 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासह प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख नेते खासदार संजय राऊत आज शनिवारी दुपारी विमानाने मुंबईहून बेळगावात दाखल झाले आहेत.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर आयोजकांसह महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी खासदार संजय राऊत यांचे उस्फुर्त स्वागत केले. त्यानंतर खासदार राऊत यांना घेऊन सर्व लवाजमा क्लब रोडवरील ईफा हॉटेल येथे आला. तथापि खासदार संजय राऊत यांना फिफा हॉटेलमध्ये वास्तव्य करण्यास पोलीस आणि मज्जाव केला, तसेच त्यांना शहराबाहेरील काकतीनजीकच्या फेअर फील्ड मेरिओट या तारांकित हॉटेलमध्ये जाण्याची सूचना केली.
फेअर फील्ड मेरिओट येथे शिवसेनेचे नेते व ‘सामना’ या दैनिकाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी नेतेमंडळीसह मान्यवरांनी गर्दी केली होती. म. ए. समिती आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी यावेळी बेळगाव सह सीमाभागातील कर्नाटक सरकारच्या दडपशाही संदर्भात तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य बाबींबाबत चर्चा केली.
खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी बेळगाव लाईव्हचा आवर्जून उल्लेख करून बेळगाव लाईव्ह टीमची भेट घेतली. बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्याशी चर्चा करून शुभेच्छा दिल्या.
सार्वजनिक वाचनालयातर्फे 47 व्या बॅरिस्टर नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन आणि पुरस्कार वितरण सोहळा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते आज सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. त्यानंतर खासदार राऊत यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होईल.