सालाबादप्रमाणे रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने आयोजित अन्नोत्सवाला खवय्यांचा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून देशभरातील खाद्यसंस्कृतीचे दर्शन या अन्नोत्सवाद्वारे बेळगावकरांना घडत आहे.
शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर सदर रोटरी अन्नोत्सव- 2020 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर अन्नोत्सवात विविध प्रकार आणि स्वादाच्या खाद्यपदार्थांसह विभिन्न मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध आहेत. खाद्यपदार्थ विभागात चटकदार पदार्थांबरोबरच मालवणी, कोल्हापुरी, खानदेशी, पंजाबी, साउथ इंडियन, बंगाली, राजस्थानी आदी खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने शाकाहारी पदार्थांबरोबरच चटकदार मांसाहारी खाद्यपदार्थ आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. काल रविवारी साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर अन्नोत्सवास खवय्यांनी मोठीच गर्दी केली होती.
खाद्यपदार्थांत बरोबरच सहकुटुंब अन्नोत्सवास येणाऱ्यांसाठी मनोरंजनाची साधनेही याठिकाणी उपलब्ध आहेत. जायंट व्हील बरोबरच लहान मुलांकरिता इतर मनोरंजनाचे क्रीडाप्रकार याठिकाणी मांडण्यात आले आहेत.
रविवारी विविध संगीत कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे संगीत मैफिलीचा आनंद लुटतात खवय्यांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला. खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाच्या साधनांन व्यतिरिक्त या अन्नोत्सवात खरेदीचा आनंद लुटण्यासाठी गृहोपयोगी साहित्य, वस्त्रप्रावरणे, फर्निचर साहित्य, विविध वाहने, बँकिंग आदींचे स्टॉल देखील मांडण्यात आले आहेत.