स्वार्थी व्यापारीवृत्तीचे लोक आणि वन खात्याच्या प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच कारनजोल, गवळी वाडा आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांचा वन्यप्राण्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील बदलाची परिणीती गोवा- कर्नाटक हद्दीवरील म्हादाई अभयारण्यातील 4 वाघांच्या मृत्यूमध्ये झाल्याचे उघडकीस आले आहे.
उपरोक्त गावांमधील ग्रामस्थ मूळचे वन्य जीवनाशी जुळवून घेणाऱ्या आदिवासी जमातीचे असले तरी गेल्या काही वर्षापासून त्यांचा पर्यावरण आणि वन्य प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पर्यावरण आणि वन्य प्राण्यांबाबत ते आता हिंसक बनू लागले आहेत. यात भर म्हणून वनखात्याने या आदिवासी जमातीच्या हिंसकतेला कंटाळून त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरू केले आहे. याची परिणीती चार उमद्या वाघांच्या दुर्देवी मृत्यू मध्ये झाली आहे. असे केरी- गोवा येथील स्थानिक वन्य प्राणीप्रेमी कार्यकर्ते सुधाकर (नाव बदललेले) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. जंगलातील झाडे वगैरे तोडून बेकायदा आर्थिक कमाई करण्याच्या आपल्या मार्गात वनखात्याच्या अधिकार्यांचा अडथळा येत असल्याने कारनजोल गावच्या ग्रामस्थांनी आपल्या गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर ‘वनखात्याच्या व्यक्तींना प्रवेश बंदी’ असा चक्क नामफलक उभा केल्या असल्याचेही पर्यावरण प्रेमी सुधाकर यांनी सांगितले.
संबंधित गावांमधील ग्रामस्थांच्या दृष्टीकोनात बदल होण्यास काही व्यापारीवृत्तीची मंडळी कारणीभूत आहेत. कारण या मंडळींनीच ‘जंगलाचा तुमच्या आर्थिक कमाईसाठी वापर करा’ असे चुकीचे मार्गदर्शन ग्रामस्थांना केले आहे. परिणामी सदर ग्रामस्थांनी बेकायदा जंगलतोड करणे वगैरे अवैध प्रकार करण्यास सुरू केली आहे. वनखाते देखील संबंधित ग्रामस्थांच्या हिंसक व आक्रमकवृत्तीच्या नादी न लागलेले बरे असा पवित्रा घेऊन गप्प बसले आहे. कांही पर्यावरण व वन्य प्राणी प्रेमी कार्यकर्त्यांनी संबंधित ग्रामस्थांच्या बेकायदेशीर कृत्यांना विरोध करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि यापैकी कांही कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले तर काहींवर थेट हल्लाच करण्यात आला.
गेल्या 20 दिवसापूर्वी चार जणांच्या व्याघ्र कुटुंबातील एका वाघाने गवळी कुटुंबीयांची गाय ठार मारली. विश्वसनीय सूत्रानुसार मिळालेल्या मिळालेली माहिती अशी की, त्यावेळी स्वार्थी व्यापारी वृत्तीच्या काही मंडळींनी संबंधित ग्रामस्थांना ‘तुम्ही त्या वाघालाच ठार मारा म्हणजे प्रश्नच मिटेल’, असा चुकीचा सल्ला दिला. त्यानंतर 30 डिसेंबर 2019 रोजी वाघाने एक एका रेड्याला ठार मारले परिणामी अधिकच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनीच त्या वाघाला ठार मारले असावे. त्याचप्रमाणे वाघाला ठार मारण्यासाठी व्यापारीवृत्तीच्या मंडळींनी ग्रामस्थांना जहाल विष पुरवले असल्याचा संशय आहे. सर्वप्रथम जेंव्हा एक वाघ मृत्युमुखी पडला तेव्हा संबंधित मंडळींनी त्याची नखे पळवली असावीत, असे सुधाकर यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध स्थानिक वन्य प्राणी प्रेमी कार्यकर्ते विजय शेळके यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 5 जानेवारी रोजी एका नर वाघाचे कलेवर सापडल्यानंतर वनखाते सतर्क झाले. मृत्यू पावलेला 4 वर्षीय वाघ हा म्हादई अभयारण्यात जन्मून मोठ्या झालेल्या ‘त्या’ चार सदस्यीय व्याघ्र कुटुंबातील आहे हे लक्षात येताच वन खात्याने जंगल प्रदेशातील उर्वरित 3 वाघांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची शोध मोहीम हाती घेतली. मात्र दुर्दैवाने या मोहिमेदरम्यान उर्वरित 3 वाघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
गोल्याळी ग्रामस्थांनी सर्वप्रथम नंदा गवस या ट्रेकरला वाघाच्या मृत्यूची माहिती दिली आणि त्याने मग वनखात्याला तसे कळविले तपासात असे आढळून आले आहे की, जंगलातील एका पाण्याच्या प्रवाहापासून 100 मीटर अंतरावर वाघाचे कलेवर सापडले. त्यावरून विषबाधा झाल्याचा संशय असलेल्या वाघाने पाणी पिण्यासाठी जवळच असलेल्या त्या जल स्तोत्राकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने वाटेतच मृत्यूने त्याला गाठले. मृत वाघ धिप्पाड असल्याने त्याला उचलून घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे त्याच्यावर विष प्रयोग करणाऱ्या उपद्रवी लोकांनी त्याची नखे काढून घेतल्याचे उघड झाले आहे. याची वनखात्याने गंभीर दखल घेतली असून त्या उपद्रवी लोकांचा शोध हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात गोवा वनखात्यालाही कळविण्यात आले आहे.