गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बेळगाव दौऱ्यावर असणार आहेत रविवारी पाच जानेवारी रोजी उचगावं येथील मराठी साहित्य संमेलनाचे ते उदघाटन करणार आहेत.उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 18 वे उचगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी होणार आहे.
संमेलनाची सुरुवात सकाळी 8.30 वा. उचगाव येथील मध्यवर्ती गांधी चौकातील गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून ग्रंथदिंडीने होणार आहे. सदर साहित्य संमेलन चार सत्रांमध्ये होणार असून यामध्ये साहित्यिक, कवी, विचारवंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा संमेलन सोहळा पार पडणार आहे.
या संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी आणि उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन व दैनिक तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर आणि चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची उपस्थिती असणार आहे.तर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद गोविंदराव जोशी असणार आहेत.
उचगाव मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून प्रत्येकाच्या तोंडी, मनी एकच ध्यास तो म्हणजे18 वे साहित्य संमेलन. उचगाव येथील निसर्गरम्य मळेकरणी देवीच्या आमराईत हे साहित्य संमेलन होणार आहे.