Friday, January 3, 2025

/

अर्बन बँक निवडणुकीतील बहुतांश उमेदवार अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार

 belgaum

द पायनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणातील 21 उमेदवारांपैकी बहुतांश उमेदवार हे अपात्र असल्याचा आरोप करून उमेदवारांच्या शुद्धता, पात्रता आणि पूर्णतेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले जावेत, अशा मागणी वजा तक्रारीचे निवेदन बँकेचे सभासद व उमेदवार विकास कलघटगी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

पायोनियर अर्बन बँकेची निवडणूक येत्या 31 जानेवारी 2020 रोजी होणाऱ असून एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मी बँकेचा सभासद (क्र. 6272) असून यंदाची निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मला सदर निवडणूक लढविणारे अन्य उमेदवार निवडणुकीस पात्र आहेत की नाहीत हे जाणुन घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यानुसार माझ्या मते निवडणूक रिंगणातील बहुतांश उमेदवारांकडून सहकारी कायद्याचे पोट कलम 44.6, 44.6 (2) व (3) चे उल्लंघन झाले आहे. पोटकलम 44.6 नुसार बँकेची निवडणूक लढविणाऱ्या सभासदाचे बँकेमध्ये किमान 500 रुपये भाग भांडवल असावे, तसेच किमान 1000 रुपयांची कायम स्वरूपी ठेव असावी, सभासदाने आपल्या बँक खात्याचा किमान पाच वेळा तरी वापर केलेला असावा. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार जर या सर्व बाबींची सलग 3 वर्षे पूर्तता झालेली नसेल तर संबंधित सभासद निवडणूक लढविणे तर दूरच तो सर्वसाधारण बैठकीतील किंवा निवडणुकीतील मतदानासाठीही अपात्र ठरतो.

Pioneer bank
Pioneer bank bldg

सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या बहुतांश उमेदवारांकडून निवडणुकीसाठी आवश्यक अनिवार्य तरतुदींची पूर्तता झालेली नाही. तेंव्हा कर्नाटक सहकारी सोसायटी कायद्याच्या 14 – बी (2)(1) नियमानुसार निवडणूक अधिकारी उदय पाटील यांनी याबाबत सखोल चौकशी करावी. तसेच निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी करावी आणि सहकारी कायद्यानुसार ज्यांनी निवडणुकीसाठी अनिवार्य तरतुदींची पूर्तता केलेली नसेल अशा उमेदवारांना अपात्र ठरवावे, अशा आशयाचा तपशील विकास रत्नाकर कलघटगी यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. माहितीसाठी निवेदनामध्ये कलघटगी यांनी निवडणूक रिंगणातील सर्व 21 उमेदवारांची नावे देखील नमूद केलेली आहेत.

विकास कलघटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह आपल्या निवेदनाच्या प्रती संयुक्त निबंधक सहकारी सोसायटी बेळगाव, उपनिबंधक सहकारी सोसायटी बेळगाव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पायोनियर अर्बन को-ऑप. बँक बेळगाव यांना देखील दिल्या आहेत.

दरम्यान, आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज छाननीचा दिवस होता. शनिवारी अर्ज माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये रमेश शिंदे, मारुती देवगेकर, थतप्पा देवगेकर, गजानन पाटील, शिवराज पाटील, रणजित चव्हाण पाटील, आनंद बाचुळकर, प्रदीप अष्टेकर, मारूती मनवाडकर, रवी दोड्डणावर, चंद्रकांत मंडाळेकर, रवी पोतदार, अनंत लाड, विकास कलघटगी(सर्वजण सामान्य)विद्याधर कुरणे (अनुसूचित जाती), मारुती शिगीनहळळी(अनुसूचीत जमाती), सुहास तरळ, गजानन ठोकणेकर (ओबीसी) सुवर्णा शहापुरकर,लक्ष्मी कानूरकर ,विमल लाड (महिला राखीव) यांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.