बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे महत्त्वाची सरकारी कार्यालय हलविण्याचा निर्णय उद्या मंगळवारी होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत घेतला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी दिली.
सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाचे स्थलांतर करण्यासाठी मंगळवारच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. सुवर्ण विधानसौधमध्ये कार्यालयांसाठी जागा मिळवण्यासंदर्भात लवकरच निवेदने दिली जाणार आहेत. उत्तर कर्नाटकातील जनतेच्या हितासाठी सरकारी कार्यालयांचे बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये स्थलांतर केले जाणार आहे, असे ईश्वरप्पा यांनी स्पष्ट केले. सदर कृतीचा कोणी राजकीय फायदा उठवणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. सरकारी कार्यालये सुवर्ण विधानसभेमध्ये हलविण्यामागे कोणताही राजकीय हेतू नाही तथापि काही लोक जमीन, भाषावाद हा मुद्दा घेऊन विनाकारण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करताहेत असे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्यमंत्री ईश्वरप्पा म्हणाले.
मंत्री ईश्वरप्पा यांचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संदर्भातच होते. सीमाभागातील परिस्थिती बिघडविण्यास माननीय उद्धवजी ठाकरे जबाबदार असल्याचे ईश्वरप्पा यांना सांगावयाचे होते. मात्र मात्र तेवढे धारिष्ट नसल्यामुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपले मत मांडले असे राजकीय जाणकारांकडून सांगण्यात आले.