स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावमध्ये भारतातील पहिले मिनिएचर एअरपोर्ट अर्थात लघु विमानतळ उभारण्यात येणार असून 6 कोटी रूपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी व्हॅक्सिन डेपो येथील जागा प्राथमिक स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांनी ही माहिती दिली आहे. यांनी दिलेल्या माहितीनुसार हँबर्ग, जर्मनी येथील वंडरलैंडमधील मिनीएचर एअरपोर्टच्या धर्तीवर बेळगावातील मिनिएचर एअरपोर्टची उभारणी केली जाणार आहे. या लघु विमानतळावर विमानतळाशी संबंधित चेक इन, बोर्डींग, लँडिंग, विमानाचे पार्किंग आदी सर्व प्रक्रिया पाहता येणार आहेत. ज्यामुळे प्रत्यक्ष खऱ्या विमानतळावर दररोज काय- काय घडते असते याचा अभ्यास मुलांना करता येणार आहे. या लघु विमानतळावर रनवे अर्थात धावपट्टीही असणार आहे. विमानांची आवड असणाऱ्यांसाठी हे नियोजित मिनिएचर एअरपोर्ट ही एक पर्वणीच असणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सदर मिनिएचर एअरपोर्ट बनविण्याचा निर्णय पंधरवड्यापूर्वी घेण्यात आला. या प्रकल्पाच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असणार असून हवाई दलाचे अधिकारी मंडळाचे सदस्य असतील असेही कुरेर यांनी स्पष्ट केले.
टिळकवाडीतील ॲक्शन डेपो येथील व्हॅक्सिन डेपो मैदानाजवळील जागा या प्रकल्पासाठी प्राथमिक स्वरूपात निश्चित करण्यात आली आहे. नियोजित मिनिएचर एअरपोर्टवर व्यवसायिक विमानांच्या प्रतिकृती बरोबरच भारतीय हवाई दलाकडून वापरल्या जाणाऱ्या मिग फायटर जेट, सुखोई यासारख्या लढाऊ विमानांच्या लघु प्रतिकृतीही पहावयास मिळणार आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विमानांसंबंधीची शास्त्रशुद्ध माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय याठिकाणी आणि आर्ट गॅलरीही असणार आहे. या आर्ट गॅलरीसाठी 12 कोटी रुपये खर्चाची योजना तयार करण्याचा विचार सुरू आहे. सदर आर्ट गॅलरीच्या माध्यमातून भारताच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात आम्हाला एव्हिएशन अँड स्पेस सायन्स गॅलरीची परिकल्पना सुचली. नितीन देसाई हे व्हॅक्सिन डेपो येथील नियोजित एव्हीएशन अॅन्ड स्पेस सायन्स गॅलरीची उभारणी करणार आहेत, असे शशिधर कुरेर यांनी सांगितले.
नियोजित एव्हिएशन म्युझियम अर्थात विमान संग्रहालय सध्या रिकाम्या असलेल्या ग्लास हाऊसमध्ये उभारण्यात येईल आणि ग्लास हाउस शेजारील खुल्या जागेत आर्ट म्युझियम अर्थात कला संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. या दोन्ही संग्रहालयांची अंतर्गत जोडणी करून संयुक्त संग्रहालय उभारले जाणार आहे. विमान संग्रहालयात स्थिर स्थापन प्रतिकृती आणि डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून विमानांचा इतिहास सांगितला जाणार आहे. कला संग्रहालयामध्ये देखील डिजिटल यंत्रणेचा वापर करून माहिती दिली जाईल. या ठिकाणी स्थानिक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी खास जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.