मराठा को-ऑपरेटिव्ह बँक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पॅनेलमधील उमेदवारांनी नुकतीच कुद्रेमानी गावाला भेट देऊन भागीदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यानिमित्त बैठकीचेही आयोजन करण्यात आले होते.
कुद्रेमानी (ता. बेळगाव) गावातील भाग्यलक्ष्मी सोसायटीच्या सभागृहात झालेल्या सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मल्लाप्पा पाटील हे होते. व्यासपीठावर मराठा बँकेचे सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी उमेदवार बाळासाहेब काकतकर यांनी मराठा बँकेचा कारभार पारदर्शक असल्याचे सांगून बहुजन समाजाच्या हिताचे व्रत घेऊन ही बँक कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतीक क्षेत्रांच्या विकासासाठी मराठा बँक नेहमीच सहकार्य करत असल्याचे सांगितले.
लक्ष्मण होनगेकर यांनी आपल्या समयोचित भाषणात मराठा बँक सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर यांनी मराठा बँकेने ग्रामीण भागातील लोकांसाठी कृषी कर्ज योजना सुरु करावी असा प्रस्ताव मांडला.
बैठकीस उमेदवार मोहन चौगुले, दिगंबर पवार, बाबूराव पाटील, बाळाराम पाटील, विनोद हंगीरकर, शिवाजी हंगीरकर, विश्वनाथ हंडे, काशिनाथ गुरव, बी. एन. पाटील आदी उपस्थित होते. रवी पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर एम बी गुरव यांनी आभार मानले.