महाराष्ट्रातील साहित्यिक व कवींना इदलहोंड साहित्य संमेलनात प्रवेश बंदी! आयोजकांसह साहित्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी
इदहोंड (ता. खानापूर) येथे आज रविवारी होणाऱ्या गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना प्रवेश दिला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेत पोलीस प्रशासनाने इदलहोंडा क्रॉस येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आयोजकांमध्ये खळबळ उडाली असून साहित्यप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तसेच पोलीस आपल्या भूमिकेशी ठाम राहिल्यास या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
इदहोंड (ता. खानापूर) येथील गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलन योजनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना प्रवेश दिला जाणार नाही असे स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंमबरगी यांनी गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या आयोजकांना ठामपणे सांगितले आहे. या अनुषंगाने स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख निंबरगी है सुमारे 100 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेऊन इदलहोंड क्रॉस येथे ठाण मांडून बसले आहेत. यामुळे या ठिकाणाला रविवार सकाळपासून पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरून दोन्ही बाजूकडून सुरू असलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर या संमेलनाच्या आयोजनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल कन्नड संघटनांकडून संमेलनास विरोध केला जाईल अशी पोकळ भीती घालत पोलिसांनी आज रविवार सकाळपासूनच संमेलनाच्या आयोजनात आडकाठी घालण्याचा प्रकार सुरू केला आहे. महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवी ना आम्ही संमेलनात भाग घेऊ देणार नाही. तुम्हाला जर संमेलन यशस्वी करायचे असेल तर स्थानिक साहित्यिक आणि कवींना घेऊन ते यशस्वी करा असे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आयोजकांना सांगितल्याचे समजते. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की सदर गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात बहुतांश साहित्यिक व कवी हे महाराष्ट्रातील आहेत. तेंव्हा त्यांनाच जर संमेलनात सहभागी होण्यापासून वंचित ठेवण्यात आल्यास मराठी भाषा, साहित्य व संस्कृती जिवंत ठेवण्याचा मूळ उद्देश विफल होणार आहे.
पोलिस प्रशासनाने काल शनिवारी रात्री उशिरापर्यंत सदर साहित्य संमेलनाला परवानगी देण्यास टाळाटाळ चालवली होती. तथापि कोणत्याही प्रकारे भाषिक तेढ अथवा तणावाचे वातावरण निर्माण होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन ठरल्याप्रमाणे संमेलन यशस्वी करण्याचा चंग आयोजकांनी बांधला आहे.
इदलहोंड येथील पिसे देव मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे आज आयोजन करण्यात आले आहे. सदर संमेलनात मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचा जागर घालण्यात येणार आहे. हे साहित्य संमेलन पूर्णपणे बिगर राजकीय व्यासपीठ असताना केवळ मराठीच्या आकसापोटी आता पोलिसांनी महाराष्ट्रातील साहित्यिक आणि कवींना परवानगी नाकारून एक प्रकारे व्यक्ती व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा निंदनीय प्रकार केला असल्याचे बोलले जात असून साहित्यप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच पोलीस आपल्या या भूमिकेशी ठाम राहिल्यास या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासह महाराष्ट्रातील बरेचसे साहित्यिक आणि कवी खानापुरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुस्कटदाबी झुगारून घटनाबध्द रीतीने गुंफण सद्भावना मराठी साहित्य संमेलन सुसूत्रपणे पार पाडले जाईल असा विश्वास संयोजक गुणवंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.