साहित्यावरील विश्वास लोक चळवळी शिवाय पूर्ण होऊ शकत नाही चळवळी साठीच साहित्य निर्माण झालेले असते असे विचार औरंगाबादचे लेखक डॉक्टर बालाजी जाधव यांनी व्यक्त केले.
मराठी साहित्य संघ कडोली तर्फे आज रविवारी आयोजित 35 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले त्याहीआधी चाणक्य, बुद्ध आदी सर्वांनीच चळवळीसाठी साहित्याचे लिखाण केले. गौतम बुद्धांना देखील त्यांचे साहित्य संस्कृतमध्ये लिहिण्याची सक्ती करण्यात आली परंतु ती सक्ती झुगारून त्यांनी पाली या लोकभाषेत साहित्याची रचना केली.
बाराव्या शतकात चक्रधर, संत बसवन्ना, श्री ज्ञानेश्वर, एकनाथ यांनी प्रचंड लिखाण केले आहे असे सांगून वंचित लोकांच्या दुःखावर फुंकर घालणाऱ्या साहित्याची आज गरज असून भाषा, धर्म, जात, प्रांत असे सर्व भेद ओलांडून पुढे जाते ते खरे साहित्य असे डॉ. बालाजी जाधव यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर जाधव यांनी कडोली साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढून मराठी साहित्य संमेलनाचा यज्ञकुंड धगधगता ठेवायचा असेल तर या संमेलनाचा आदर्श अखिल भारतीय संमेलनाने घ्यावा, असे उस्फुर्त मत व्यक्त केले.
प्रारंभी आज रविवारी सकाळी कडोली गावाच्या मध्यवर्ती विभागातील श्री रेणुका मंदिरापासून संमेलनाच्या ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. हभप महादेव बिर्जे यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे उद्घाटन झाले. सवाद्य निघालेल्या या भव्य ग्रंथदिंडीत साहित्यिक, कवी, ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमींसह कडोली केदनूर, जाफरवाडी, हंदिगणूर अलतगा आदी भागातील विविध प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीमधील विद्यार्थ्यांची लेझीम व टिपरी पथके, विविध भजनी मंडळे, साहित्यिक व राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी सार्यांचे लक्ष वेधून घेत होते. गावातील प्रमुख मार्गावरून फिरून श्री शिवाजी हायस्कूलच्या पटांगणावरील स्वामी विवेकानंदनगरीमध्ये ग्रंथ दिंडीची सांगता झाली.
डॉ. बालाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटक उद्यमबाग बेळगाव येथील एसपीएम कंट्रोलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण सावंत, कोल्हापूरचे इंद्रजीत देशमुख, सांगलीचे जीवन आकाराम सावंत, जितेंद्र लाड, तालीब सोलापूरी, अनंत राऊत, कडोली ग्रामपंचायत अध्यक्षा मनीषा पाटील, मराठी साहित्य संघ कडोलीचे अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. ईशस्तवन व स्वागतगीताने उद्घाटन समारंभाला सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर संमेलनाचे उद्घाटन लक्ष्मण सावंत यांच्यासह व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. तत्पूर्वी कै. माधवराव ( बाळ) भोसले स्मृती संमेलन मंडपाचे उद्घाटन, सांगाती व्यासपीठ उद्घाटन दयानंद सलाम यांच्या हस्ते आणि ग्रंथ दालनाचे उद्घाटन संतू बेळगावकर यांच्या हस्ते झाले. तसेच शिवप्रतिमा पूजन, सावित्रीबाई फुले प्रतिमा, श्री सरस्वतीपूजन, संत ज्ञानेश्वर प्रतिमापूजन, महात्मा ज्योतिबा फुले प्रतिमा पूजन, कै. प्रा. तुकाराम पाटील प्रतिमापूजन अनुक्रमे राजाराम मोहोळकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनीषा पाटील, संजय पाटील (हंदिगणूर), ॲड. शाम पाटील, पुंडलिक पाटील व सतीश पाटील यांच्या हस्ते झाले.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. मायापा पाटील यांचे वाचाल तर वाचाल या विषयावर व्याख्यान झाले. तिसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन रंगले. या कविसंमेलनात मुंबईचे जितेंद्र लाड, अकोल्याचे अनंत राऊत सोलापुरचे तालीब सोलापूरी आदींचा सहभाग होता. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात आटपाटी येथील ग्रामीण कथाकार जीवन सावंत यांचा कथाकथनाचा कार्यक्रम झाला.
कडोली साहित्य संमेलनाला बेळगाव, खानापूर, निपाणी परिसरातील साहित्यिक, कवी, साहित्य संस्था व विविध मंडळांचे पदाधिकारी तसेच साहित्यप्रेमींसह पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.