नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगावसह धारवाड आणि वास्को-द-गामा या तीन रेल्वे स्थानकांना पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीसाठीचे आएसओ 14001- 2015 प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे.
नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाचे डीआरएम अरविंद मालखेडे यांच्याकडे 13 जानेवारी 2020 रोजी समारंभपूर्वक बेळगाव, धारवाड, वास्को-द-गामा रेल्वेस्थानकासाठीचे आयएसओ 14001- 2015 प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) ने निश्चित केलेल्या राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून प्रदान करण्यात आलेले हे प्रमाणपत्र 3 वर्षासाठी वैध असणार आहे.
पर्यावरण पूरक कचरा व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, वेटिंग रूम्स्, रिफ्रेशमेंट रूम्स, रिझर्व लाउज आदी आवश्यक सुविधा व संबद्ध सेवांची पूर्तता करणाऱ्या रेल्वे स्थानकांना आयएसओ 14001- 2015 हे प्रमाणपत्र दिले जाते. आता आता यापुढे बेळगाव धारवाड आणि वास्को-द-गामा या तीन रेल्वेस्थानकावरील आवश्यक सुविधा आणि संबध्द सेवांची वर्षातून एकदा पाहणी करून त्यामध्ये सातत्य टिकविले जात आहे की नाही? याची पडताळणी केली जाणार आहे.
यापूर्वी हुबळी विभागातील फक्त हुबळी रेल्वे स्थानकाला आयएसओ 14001- 2015 प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र आता त्यामध्ये आणखी तीन रेल्वेस्थानकाची भर पडल्यामुळे सदर आयएसओ प्रमाणपत्र मिळवणाऱ्या हुबळी विभागातील रेल्वे स्थानकांची संख्या 4 झाली आहे.