गेल्या कांही वर्षापासून हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कंपनीकडून ग्रामीण भागातील ग्राहकांकडून वर्षातून एकदा सुरक्षा विम्याच्या (इन्शुरन्स) नांवाने प्रत्येकी 130 ते 140 रुपये गोळा केले जात आहेत. तथापि इन्शुरन्स म्हणून ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या या पैशाचा विनियोग नेमका कशासाठी केला जातो? याबद्दल साशंकता व्यक्त होताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पिरनवाडी येथे वर्षातून एकदा एक महिला एच.पी. गॅस कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगून घरोघरी जाऊन स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर आणि शेगडीची पाहणी करून सर्व ठीक ठाक आहे ना हे पाहते. पाहणीअंती रजिस्टरमध्ये नांव वगैरे माहिती नोंद करून घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्यानंतर सदर महिला ग्राहकांकडून 130 रुपये घेते. हे पैसे कशासाठी घेता असा प्रश्न विचारला असता गॅस गळतीच्या दुर्घटना घडत असतात अशा घटनांमधील पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी इन्शुरन्स म्हणून आम्ही हे पैसे गोळा करतो असे संबंधित महिलेकडून सांगितले जाते. दरम्यान, आजपर्यंत कोणत्याच गॅस दुर्घटनेतील पीडितांना एच. पी. गॅस कंपनीकडून नुकसान भरपाई दिली गेल्याचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे आढळून आलेले नाही. तेंव्हा गेल्या कांही वर्षापासून ‘इन्शुरन्स’च्या नावाखाली जमा केले जाणारे लाखो रुपये कुठे जात आहेत? असा सवाल एच.पी. गॅसच्या कांही जागरूक ग्राहकांकडून केला जात आहे.
एका पिरनवाडी गावातच हिंदुस्तान पेट्रोलियम गॅस कंपनीचे सुमारे अडीच ते तीन हजार कनेक्शन्स आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडून 130 रुपये प्रमाणे जमा होणाऱ्या पैशाचे काय केले जाते असा प्रश्न संबंधित ग्राहकांना पडला आहे.
हालगा, आंबेवाडी आदी ठिकाणी अलिकडेच गॅस दुर्घटनेच्या घटना घडल्या आहेत. याचा संदर्भ देऊन संबंधित पीडितांना नुकसानभरपाई का देण्यात आलेली नाही? अशी विचारणा ग्राहकांनी एच.पी. गॅसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘त्या’ महिलेकडे केली असता तिने दुर्घटनेतील गॅस सिलेंडर्स एचपीचे नसावेत वगैरे उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते.
इन्शुरन्स जमा करण्याच्या या कृतीबद्दल साशंकता वाटल्याने गेल्या वेळी एका ग्राहकाने त्या महिलेला 130 रुपये देण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर जेंव्हा त्या ग्राहकाने गॅस बुकिंगसाठी फोन केला तेंव्हा प्रथम मागील 130 रुपये भरा त्याशिवाय गॅस बुकिंग केले जाणार नाही असे त्याला सुनावण्यात आले. परिणामी संबंधित ग्राहकाला नाईलाजाने 236 रुपये इन्शुरन्सच्या नावाने भरावे लागले. थोडक्यात इन्शुरन्सचे 130 सक्तीने ग्राहकांना भरावेच लागत असून अन्यथा त्यांची गॅस बुकिंग नाकारून कोंडी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
इन्शुरन्सच्या नावाने आमच्याकडून खुशाल पैसे घेऊ देत. परंतु ते पैसे गॅस दुर्घटनेतील पीडितांपर्यंतच पोचले पाहिजेत, अशी समस्त एचपी गॅस ग्राहकांची माफक अपेक्षा आहे. तरी हिंदुस्तान पेट्रोलियमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे ग्राहकांच्या मनातील साशंकता दूर करावी. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींनीही याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.