मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांनी विविध छंद जोपासावेत आणि त्या छंदातूनच पुढे त्यांना अर्थार्जनाचा मार्गही मिळावा या हेतूने भाग्यनगर येथील व्ही. एम. शानभाग मराठी शाळेमध्ये हस्तकला – चित्रकला यासह विविध कलाकृतींचे प्रदर्शन उत्साहात पार पडले.
सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी सकाळी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे जायंट्स क्लबचे माजी अध्यक्ष राजू माळवदे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू , पदाधिकारी पी. एस. आजगांवकर, बिंबा नाडकर्णी, विजया पै, लता कित्तूर, धनश्री आजगांवकर आदी उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. शिक्षिका सविता वेसणे यांनी सर्वांचे स्वागत केले.
सदर प्रदर्शन सुनिता वेसणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक थोर व्यक्तींची काढण्यात आलेली चित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. याशिवाय रंग-बिरंगी फुले, लोकरी कामाच्या विभिन्न आकर्षक वस्तू, माती कामातून तयार केलेल्या सुबक गणपती व अन्य विविध मूर्ती आदी गोष्टी लक्ष वेधून घेत होते. हे प्रदर्शन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादरही करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे राजू माळवदे यांनी प्रदर्शनाची पाहणी करून प्रशंसोद्गार काढले. तसेच अत्यंत कमी खर्चात विद्यार्थ्यांनी इतक्या सुंदर वस्तू बनवल्याबद्दल त्यांनी शाळेच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. यावेळी व्ही. एम. शानभाग शाळेच्या मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, एम. आर. भंडारी शाळेच्या मुख्याध्यापिका सावित्री नाईक, शिक्षक वर्ग पालक आणि हितचिंतक उपस्थित होते.