कर्नाटक सरकारने जन्म आणि मृत्यूची नोंद सहज सोपी होण्यासाठी ई जन्म पोर्टल ची निर्मिती केली आहे. बेळगाव शहरातील 10 प्रसूतिगृहात हे पोर्टल बसवण्यात आले आहे. या माध्यमातून जन्म आणि मृत्यू झालेल्या वेळी लगेच नोंदणी करण्याची सेवा मिळणार आहे. लवकरच शहरातील सर्व हॉस्पिटल मध्ये हे पोर्टल बसवण्यात येणार आहे.
सध्या जन्म किंवा मृत्यूच्या दाखल्यासाठी महानगरपालिकेत जावे लागते. नोंद वेळेत झालेली नसेल तर थांबावे लागते पण यापुढे महानगरपालिकेत न जाता त्याच हॉस्पिटलमध्ये लागलीच जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवता येणार असल्याचे कर्नाटक सरकारने कळवले आहे.
या पोर्टल वर राज्यात 2008 नंतर झालेल्या सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचा डाटा सेव्ह करण्यात येत आहे.बेळगाव शहरात महिन्याला 22 ते 24 हजार महिला प्रसूत होतात. यामध्ये शहरातील, आसपासच्या तालुक्यातील तसेच महाराष्ट्र आणि गोवा येथील मातांचा समावेश असतो. प्रसूतीची व वाहतुकीची चांगली सोय असल्याने येथे येण्याचे प्रमाण जास्त आहे.
जन्म झाला की हॉस्पिटल कडून माहिती महानगरपालिकेला देण्याची पद्धत होती. पूर्वी आठवड्यातून एकदा आणि आता दोन ते तीन वेळाय प्रमाणे ही माहिती दिली जात होती. पण माहिती पोचली तरी मनपाकडे नोंद होईपर्यंत प्रमाणपत्र मिळत नव्हते.