खानापूर रोडवरील डी-मार्टसमोरील गजानन साॅ-मिलमागील बाजूस असणाऱ्या पटेल बिल्डींगच्या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावरून वहात असल्याने मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेसह दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
खानापूर रोडवरील गजानन साॅ-मिलच्या मागील बाजूस असलेल्या पटेल बिल्डींग या बिल्डिंग वजा चाळींमधील रहिवाशांना गेल्या महिन्याभरापासून ड्रेनेजच्या सांडपाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथून ये-जा करण्याच्या वाटेवर दुर्गंधीयुक्त सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना नाक मुठीत धरून कसरत करत ये-जा करावी लागत आहे. ड्रेनेज ज्याठिकाणी तुंबून वाहत आहे तिथून अवघ्या पाचच फुटावर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. परिणामी सांडपाणी जमिनीत झिरपून विहिरीतील पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सतत महिनाभर सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अस्वच्छता निर्माण होऊन संबंधित भाग जणू नरकपुरीच बनला आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली आहे. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी पटेल बिल्डींग परिसराला भेट देऊन पाहणी केली, तसेच तुंबलेल्या ड्रेनेजची समस्या निकालात काढण्यासाठी शेजारीच असलेल्या मुस्लिम धर्मियांच्या दफनभूमीची आवार भिंत पाडली. यामुळे झाले भलतेच ड्रेनेजच्या सांडपाण्याचा प्रश्न निकालात निघण्याऐवजी ते सांडपाणी थेट दफनभूमीत शिरले. परिणामी दुसऱ्या दिवशी संतप्त मुस्लिम धर्मियांनी पटेल बिल्डींगमधील रहिवाशांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच आमची भिंत पूर्ववत बांधून द्या अन्यथा तुमची बिल्डिंगच आम्ही पाडवू अशी धमकीही दिली. अखेर चाळीतील रहिवाशांनी पालिकेचे कर्मचारी दफनभूमीची आवार भिंत पाडत असतानाचे मोबाईलवर केलेले चित्रीकरण त्यांना दाखविली तेंव्हा कुठे वादावर पडदा पडला.
सध्या पालिकेचे सफाई कर्मचारी दोन-तीन दिवसातून एकदा याठिकाणी येऊन सांडपाण्याबरोबर वाहत येणारा कचरा भरून घेऊन जात आहेत. तथापि तुंबलेले चेंबर साफसफाई करण्याबाबत अद्यापही ही कोणतीही हालचाल झालेली नाही. ड्रेनेज कशामुळे तुंबले अशी विचारणा केली असता तिसऱ्या रेल्वे गेटनजीक स्मार्ट सिटी अंतर्गत काम सुरू असल्याने ड्रेनेज तुंबत असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, तुंबून वाहणारे ड्रेनेजचे सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांच्या विशेष करून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तुंबलेले ड्रेनेज आणि वहात असलेले सांडपाणी यांचे फोटो महापालिका आयुक्तांनाही व्हाट्सअपद्वारे पाठविण्यात आले आहेत. परंतु त्यांच्याकडूनही अद्यापही या प्रकाराची दखल घेतली गेली नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तेंव्हा स्थानिक लोकप्रतिनिधींनी तरी याची गांभीर्याने दखल घेऊन पटेल बिल्डींग येथील तुंबून ओव्हरफ्लो होणाऱ्या ड्रेनेजची समस्या निकालात काढावी, अशी जोरदार मागणी होत आहे.