अनगोळ भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून हा जीवघेणा उपद्रव थांबविण्यासाठी संबंधित कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अनगोळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गावातील चौकाचौकात तसेच गल्लोगल्ली सध्या भटक्या कुत्र्यांच्या कळपांचा वावर वाढलेला दिसत आहे. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या एकट्या-दुकट्या व्यक्तीच्या अंगावर ही कुत्री धावून जात असल्याचे प्रकार घडत आहेत. त्याचप्रमाणे ही भटकी कुत्री रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मागेही लागत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कांही भागामध्ये तर भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे दहशत निर्माण झाली आहे. संबंधित भागातून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. दुचाकीस्वार यांच्यामागे लागणारी काही कुत्री तर ठराविक ठिकाणी एखादा वन्यप्राणी सावजाची शिकार करण्यासाठी जसा दबा धरून बसतो तशी दबा धरून बसलेली असतात. अंगावर धावून येणाऱ्या या भटक्या कुत्र्यांपासून सुटका करून घेताना नागरिकांची पुरेवाट होत आहे. सदर कुत्री अचानक अंगावर धावून येत असल्यामुळे विशेष करून महिला आणि लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुले गंभीर जखमी झाल्याच्या बातम्या अलीकडे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत. शहर परिसरात बरोबरच ग्रामीण भागात देखील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जीव घेणार ठरत आहे. काल मंगळवारी खानापूर तालुक्यातील बैलवाड गावांतील आयुष बसय्या भागोजी हे दोन वर्षाचे बालक आपल्या घरासमोर खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने चावा घेतल्यामुळे आयुष जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुत्र्याने आयुषवर हल्ला केला त्यावेळी आसपासच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कुत्र्याला हाकलून लावल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, एकंदर परिस्थिती पाहता भटक्या कुत्र्यांमुळे अशी दुर्घटना अनगोळ परिसरामध्ये पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अनगोळ परिसरातील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.