बेळगावातील ऑटोनगर कणबर्गी येथील डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचे (डीजीएफटी) कार्यालय आता बेंगलोरला हलविण्यात आले आहे.
देशातील तुलनात्मकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या प्रादेशिक प्राधिकरणांमध्ये लहान प्राधिकरणांचे विलीनीकरण करण्याद्वारे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडची पुनर्रचना करत असल्याने बेळगाव येथील डीजीएफटी कार्यालय बेंगलोरला हलविले गेले आहे.
तत्कालीन केंद्रीय कार्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सिताराम यांनी ऑगस्ट 2016 ला बेळगावमध्ये डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (डीजीएफटी) कार्यालय सुरू करण्याचे वचन दिले होते. त्याची पूर्तता एप्रिल 2017 मध्ये होऊन बेळगावातील ऑटोनगर कणबर्गी येथील बेळगाव परमनंट एक्झिबिशन कॉम्प्लेक्समध्ये हे कार्यालय सुरू झाले. आता हे कार्यालय बेंगलोरला हलविण्यात आल्याने त्याठिकाणी ‘डीजीएफटी’चा फक्त नामफलक दिसून येत आहे.
भारताच्या निर्यात क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी विदेश व्यापार धोरण किंवा एक्झिम पॉलिसी अंमलात आणण्याची जबाबदारी डीजीएफटीवर असते. डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड ऑर्गनायझेशन ही भारताच्या विदेश व्यापार महासंचालक कार्यालयाशी संलग्न असते.