वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार करून त्याची वाहतूक करणाऱ्या एका टोळीला कित्तूर वनखात्याच्या पथकाने रंगेहात पकडून त्यांच्याकडील मृत ठिपक्यांच्या हरणाचे कलेवर, एक मोटारसायकल आणि शिकारीचे साहित्य जप्त केले.
भरतेश उर्फ भरमाप्पा हनुमंत बजंत्री (वय 28 रा. बुदरकट्टी,ता. बैलहोंगल) मल्लेश हनुमंत बजंत्री (वय 24, रा. बुदरकट्टी) आणि युवराज बसप्पा बजंत्री (वय_,रा. कित्तूर, ता. कित्तूर) अशी वनखात्याने अटक केलेल्या शिकाऱ्यांची नावे असून यापैकी युवराज हा फरारी आहे. या तिघांकडून एका पूर्ण वाढ झालेल्या मृत ठिपक्यांच्या हरणासह हिरो एचएफ डीलक्स मोटरसायकल, दोन ब्लॅंकेटस्, जाळे आदी साहित्य जप्त करण्यात आले. वनखात्याच्या कारवाईप्रसंगी युवराज बजंत्री हा घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींवर वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करून वाहतूक केल्याप्रकरणी वन्यजीवन संरक्षण कायदा 1971 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कित्तूर वनखात्याचे प्रादेशिक वन संरक्षणाधिकारी (आरएफओ) सिद्धलिंगेश्वर ए. मगदूम यांच्या नेतृत्वाखालील वनखात्याच्या पथकाने कित्तूर- निचंकी रस्त्यावरील निचंकी गावानजीक सदर कारवाई केली. फरारी आरोपीचा शोध जारी असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.