बेळगाव महापालिकेकडून हल्ली झालेल्या प्लास्टिक जप्त आणि दंड वसुलीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्लास्टिक होलसेलर्सना कंपोस्टेबल पिशव्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आमदार अॅड. अनिल बेनके यांच्या उपस्थितीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमतीने महापालिकेकडून प्लास्टिक होलसेलर्सना कंपोस्टेबल पिशव्या वापरण्यास अनुमती दिली गेली आहे. याप्रसंगी कंपोस्टेबल प्लास्टिक बॅग मॅन्युफॅक्चरर्स आणि महापालिका प्रदूषण नियंत्रण अधिकारी उपस्थित होते. नव्याने आलेल्या कंपोस्टेबल पिशव्या पर्यावरणपूरक असून त्या संपूर्ण नष्ट होणारे आहेत. त्यांच्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही असा निर्वाळा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला आहे.
या पिशव्यांची निर्मिती ही मक्याची कणसे आणि भाज्यांच्या निघालेल्या तेलाच्या पेंढे पासून होते. प्लास्टिक पिशव्यांच्या ठिकाणी पर्याय म्हणून या कंपोस्टेबल पिशव्यांचा वापर योग्य ठरतो.
दैनंदिन स्वरूपात लागणाऱ्या किराणा सामान, दुकान, हॉटेल बेकरी यासह बाजारपेठेत कोणत्याही ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. विशेष म्हणजे द्रव पदार्थांसाठीही त्यांचा वापर होऊ शकतो.
या पिशव्या जैविक पदार्थ पासून बनलेला असल्यामुळे मातीमध्ये नष्ट होऊन त्यांचे खतात रुपांतर होऊ शकते. त्याचप्रमाणे जनावर आणि या पिशव्या खाल्ल्या तरी त्यांना कोणताही अपाय होत नाही. यासाठीच सदर पिशव्यांच्या वापरला मुभा असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.