कर्नल सी. के. नायडू 23 वर्षाखाली क्रिकेट स्पर्धेतील सामन्याच्या आज पहिल्या दिवशी कर्नाटकच्या भेदक गोलंदाजीसमोर आंध्रप्रदेश संघाचा पहिला डाव 281 धावांमध्ये गारद झाला. तर दिवस अखेर कर्नाटक संघाने आपल्या पहिल्या डावात 13 धावा काढल्या.
कर्नाटक कडून हा सामना खेळणारा बेळगावचा सुपुत्र सुजय सातेरी यानें यष्टीरक्षकाची भूमिका बजावत महत्वपूर्ण असे चार झेल पकडले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या मान्यतेने बेळगावातील जेएससीए स्टेडियमवर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन संघांमधील कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेचा सामना खेळला जात आहे. आज रविवारपासून सुरू झालेल्या या सामन्याचे उद्घाटन कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष जे. अभिराम यांच्या हस्ते श्रीगणेश पूजन आणि श्रीफळ वाढविण्याद्वारे झाले. याप्रसंगी केएससीए धारवाड विभाग निमंत्रक अविनाश पोतदार, दीपक पवार प्रसन्ना सुंठणकर आदी उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची परिचय करून देण्यात आल्यानंतर सामन्याला प्रारंभ झाला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या आंध्रप्रदेश संघाचा पहिला डाव कर्नाटक संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर प्रारंभापासूनच जो कोसळला तो 84.5 षटकात 281 धावा असा संपुष्टात आला. आंध्रप्रदेशच्या गिरीनाथ रेड्डी याने एकाकी लढा देत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. गिरीनाथ रेड्डी याने 134 चेंडूंमध्ये अर्धशतकासह 59 धावा झळकविल्या. मध्यंतराला आंध्रप्रदेश संघाची अवस्था 32.6 षटकात 4 बाद 91 अशी बिकट होती. त्यावेळी गिरीनाथ रेड्डी याने शेखनूर बाशा याला हाताशी धरून संघाला 84.5 षटकात 281 अशी आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. कर्नाटक संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर 104 धावांमध्ये आंध्र प्रदेशचे 5 गडी पॅव्हेलियनमध्ये परतले होते. कर्नाटक संघातर्फे गोलंदाजीत व्ही. व्यासक याने 63 धावात 4 गडी, एम. एस. भांडगे याने 49 धावा 3, अभिलाष शेट्टी याने 34 धावात 2 आणि प्रणव भाटिया याने 55 धावात एक गडी बाद केला.
आंध्रप्रदेश संघाचा डाव 281 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर कर्नाटक संघाने दिवसाखेर आपल्या पहिल्या डावात एकही गडी न गमावता 13 धावा काढल्या होत्या. त्यावेळी त्यांचा अंकित ऊडपा हा 5 आणि शिवकुमार 7 धावांवर खेळत होता.